सिंधुदुर्ग : खोक्रल सरपंच, ग्रामसेवकांना ग्रा. पं. कार्यालयातच कोंडले! | पुढारी

सिंधुदुर्ग : खोक्रल सरपंच, ग्रामसेवकांना ग्रा. पं. कार्यालयातच कोंडले!

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा :  ‘गाव तिथे रेशन धान्य दुकान’ या नियमाप्रमाणे खोक्रल गावातही रेशन दुकान व्हावे, यासाठी तेथील स्वयंसिद्ध महिला बचत गटाने कोकण विभागीय आयुक्‍तांकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार धान्य दुकानासाठी फेर जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे आदेश कोकण विभागीय उपआयुक्‍तांनी दिले.

या आदेशानुसार ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखल्यासाठी गावातील स्वयंसिद्ध महिला बचत गट व दुर्गामाता महिला बचत गटाने अर्ज करूनही नाहरकत दाखल न देता ग्रामपंचायतच्या बॉडीने ते रेशन दुकान ग्रामपंचायतीकडे ठेवण्याचा ठराव घेतला. यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही बचत गटाच्या काही महिलांनी चक्‍क ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रा.पं. सदस्य, पोलिसपाटील, आरोग्य सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ यांना कार्यालयातच डांबून ठेवले. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सपोनि जयेश ठाकूर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले व कार्यालयाचे दार उघडून त्यांनी सर्वांना बाहेर काढले.

खोक्रल गावचे रेशन दुकान उसप गावात आहे. मात्र गाव तिथे रेशन दुकान या शासन नियमानुसार धान्य दुकान आपल्या गावात व्हावे यासावठी स्वयं सिद्ध महिला बचत गटाच्या अस्मिता गवस यांनी पुढाकार घेतला. महिला बचत गटाला धान्य दुकान चालविण्यास मिळावे, अशी मागणी त्यांनी ग्रामपंचायतीकडे केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्याने महिला बचत गटाने 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. शिवाय अस्मिता गवस यांनी कोकण विभागीय आयुक्‍तांकडे याबाबत अपील दाखल केले. यावर खोक्रल गावच्या स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीर्‍यांनी फेर जाहीरनामा काढावी, असा आदेश कोकण उपआयुक्‍तांनी दिला.

उपायुक्‍तांच्या आदेशानुसार गावातील स्वयंसिद्ध बचतगट व दुर्गामाता बचत गट या दोन्ही गटांनी अर्ज दाखल केले. याबाबत तहकूब ग्रामसभेत निर्णय घेण्याचे ठरले. ही तहकूब ग्रामसभा सोमवारी लागली. स्वयंसिद्ध महिला बचत गटाच्या काही सदस्यांनी ना हरकत दाखला देण्यास हरकत घेतल्याने, तसेच गावातील महिला बचत गटांमध्ये वाद उद्भवू नये यासाठी तहकूब ग्रामसभेत धान्य दुकान बचत गटांना न देता ग्रामपंचायतीकडे ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. अर्ज केल्यानंतर ना हरकत दाखला देणे बंधनकारक असताना सरपंच, ग्रामसेवक व सदस्य जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत दोन्ही महिला बचतगटांच्य सदस्या आक्रमक झाल्या. अस्मिता गवस, आकांक्षा गवस, वैजयंती गवस, रुक्मिणी गवस, जानकी गवस, माधुरी गवस, संजना कुबल, लक्ष्मी गवस आदींसह संतप्त झालेल्या दोन्ही महिला बचत गटाच्या सदस्यांनी चक्‍क ग्रामपंचायतीला टाळे ठोकून सरपंच देवेंद्र शेटकर, तलाठी कांचन गवस, ग्रामसेवक विशाल जाधव, ग्रा.पं. सदस्य विनायक गवस, अंजू गवस, हेमा गवस, सविता गवस यांसह आरोग्य सेविका, आशा सेविका वैष्णवी शेटकर यांना ग्रा. पं. कार्यालयात डांबून ठेवले.

तब्बल एक तासानंतर सुटका
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहायक निरीक्षक जयेश ठाकूर व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिलांशी चर्चा करून कुलूप काढण्यास सांगितले. त्याला प्रथमतः महिलांनी विरोध दर्शविला, मात्र ऋषिकेश अधिकारी यांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलला दार उघडण्यास सांगितले असता बचत गटाच्या महिलेने स्वतःहून कुलूप काढून दार उघडले. त्यामुळे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सदस्य व ग्रामस्थ यांची तब्बल एक तासानंतर सुटका झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याबाबत जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

गवस यांना अश्रू अनावर
पोलिसांनी बचतगटाच्या महिला व सरपंच आणि सदस्य यांच्यात सामंजस्याने चर्चा घडवून आणली. यावेळी महिला व सरपंच यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. महिला बचत गटांनी अर्ज करूनही तुम्ही ना हरकत दाखला देण्याचा मासिक सभेत कसा काय ठराव घेता? वास्तविक कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्ही ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. दहा वर्षापासून चालू असलेल्या आमच्या महिला बचत गटात आता तुमच्यामुळेच वाद-विवाद निर्माण झाले आहेत, असा आरोप करत अस्मिता गवस यांना रडू कोसळले.

रेशन धान्य दुकानासाठी बचत गटाकडून अर्ज आले. मात्र, बचत गटातील काही महिलांचाच याला विरोध झाला. त्यामुळे धान्य दुकानासाठी गावातील दोन्ही बचत गटात कोणते वाद उद्भवू नये, गावात तेढ निर्माण होऊ नये यासाठी हे धान्य दुकान ग्रामपंचायतीनेच चालवावे असे ठरविण्यात आले. हा निर्णय माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीचा आहे. मात्र याला महिला बचत गटांनी विरोध केला. त्यांचा हा विरोध म्हणजे केवळ एक स्टंटबाजी होती.
देवेंद्र शेटकर,सरपंच

अन्यथा आत्मदहन
गावात रेशन धान्य दुकान व्हावे यासाठी दोन वर्षांपासून आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा केला. मी माझ्या लहान मुलाला सोबत घेऊन कोकण आयुक्तांकडे केस लढविली व त्यात आमचा विजय झाला. जेव्हा गावात रेशन धान्य दुकान होण्याच्या अशा पल्लवीत झाल्या तेव्हा मात्र ग्रामपंचायत धान्य दुकानासाठी प्रयत्न करू लागली. गावात धान्य दुकान व्हावे अशी मागणी ग्रामपंचायतकडे करूनही त्यावेळी ग्रामपंचायतने कानाडोळा केला. शिवाय बचत गटाच्या काही सदस्यांनी हरकत घेतली म्हणून ना हरकत दाखला न देणे योग्य नाही. सरपंच हे सुडाचे राजकारण करत असून न्याय हक्कासाठी त्यांना कार्यालयात डांबावे लागले. सरपंचांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आम्हास ना हरकत दाखला द्यावा, अन्यथा या कार्यालयासमोरच स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहन केले जाईल, असा इशारा पोलिसांसमोरच अस्मिता गवस यांनी दिला.

Back to top button