भाजप आक्रमक; केसरकर नरमले! | पुढारी

भाजप आक्रमक; केसरकर नरमले!

सिंधुदुर्ग ः पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्‍ते आ. दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्यामुळे होणारी युती फिसकटली, असा गौप्यस्फोट केल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. जाहीररीत्या काही न बोलता आमदार नितेश राणे यांनी याबाबत तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी केसरकरांवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आता आ. केसरकर नरमल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना यापुढे जसे आपण शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याचे थांबवले आहे, तसे यापुढे पत्रकार परिषदांमध्ये राणे यांच्यावरही बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर केसरकर यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्यामुळे त्यांचे प्रवक्‍तेपद कायम राहते की किरण पावसकर यांच्याकडे ते दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जेव्हापासून शिंदे गट शिवसेनेतून फुटून बाहेर पडला, तेव्हापासून शिंदे गटाचे प्रवक्‍ते म्हणून आ. दीपक केसरकर शिंदे गटाची प्रभावीपणे बाजू मांडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास त्यासाठी गोव्यात येऊन केसरकर यांचा सत्कार केला होता. शिंदे गटाची बाजू केसरकर यांनी ज्या संयमीपणे आणि अभ्यासूपणे मांडली होती, त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील दाद दिली होती. केसरकर यांचा शिंदे गटातील प्रभाव वाढत जाऊन ते एक प्रभावी नेते म्हणून महाराष्ट्रात पुढे आले आहेत. मात्र, वारंवार होणार्‍या पत्रकार परिषदा आणि त्यात केसरकर यांचे जास्त वेळ बोलणे काहीसे अंगलट आल्याचे चित्र दिसत आहे. पत्रकारांशी बोलण्याच्या ओघात शुक्रवारी त्यांनी काही गौप्यस्फोट केले. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती, तेव्हा पुन्हा एकदा युती करण्याबाबत अंतिम चर्चा झाली होती.

मात्र सुशांतसिंग रजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरे यांची बदनामी करणार्‍या राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले याबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यातून होणारी युती फिसकटली, असा गौप्यस्फोट केला होता. याबाबत राजन तेली यांनी आक्षेप घेतला. फडणवीसांची नितेश राणे यांनी घेतलेली भेट आणि राजन तेली यांनी केलेली तक्रार भाजपश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी दिवसभर केसरकरांऐवजी यापुढे किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्‍तेपदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा होती. किरण पावसकर हे पूर्वी शिवसेनेत होते. अनेक वर्षे ते राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार होते. अलिकडे ते शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना नेतेपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच केसरकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना यू टर्न घेतला आहे. त्यामुळे केसरकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील, हे येणार्‍या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.

केसरकरांना आवरा, समज द्या, ते वातावरण खराब करत आहेत, ते शिंदे गटाचे प्रवक्‍ते असले तरी ते भाजपचे प्रवक्‍ते असल्यासारखे बोलत आहेत.

– राजन तेली,
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अध्यक्ष

Back to top button