कोकण : आगामी पाच दिवस मुसळधार | पुढारी

कोकण : आगामी पाच दिवस मुसळधार

रत्नागिरी,  पुढारी वृत्तसेवा :  कोकणात अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी असताना गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार सक्रियता ठेवली. आगामी पाच दिवस कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस होणार असून, पुढील 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाचा वेग गुरुवारी सकाळी काही प्रमाणात मंदावला. मात्र, दिवसभर पावसाची संततधार सुुरूच होती. काही भगाात जोरदार पाऊसही झाला. गुरूवारी लांजा तालुक्यात 145 मि. मी. तर रत्नागिरीमध्ये 77 मि. मी. पावसाची नोंद झाली. कोकण किनारपट्टी भागावर कमी दाबाचा पट्टा विस्तारत चालल्याने मोसमी पावसाचा वेग आगामी काळात वाढणार आहे. किनारी भागात वेगवान वार्‍याने मोसमी पाऊस वाढण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुरूवारी दिवसभरात संपलेल्या 24 तासात मंडणगड तालुक्यात 47 तर दापोली तालुक्यात 49 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यात एका घराची पडझड होऊन सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. खेड तालुक्यात 16 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुहागर तालुक्यात 33, चिपळूण तालुक्यात 68, संगमेश्‍वर तालुक्यात 41, राजापूर तालुक्यात 69 मि. मी. पावसाची नोंद झाली. लांजात मंगळवारी 116, बुधवारी 22 आणि गुरूवारी तब्बल 145 मि.मी. अशी नोंद झाली.

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
गुरुवारी तब्बल 545 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाल्यानंतर पुढील पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारपासून ठाणे आणि पालघरसाठी ग्रीन, रायगडसाठी येलो, तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Back to top button