कुडाळ अपघात : कुडाळजवळ एस.टी चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे वाचले प्राण | पुढारी

कुडाळ अपघात : कुडाळजवळ एस.टी चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे वाचले प्राण

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा: सावंतवाडी एस.टी आगाराच्या सावंतवाडी-कणकवली या एस.टी बसला बुधवारी दुपारी १२.४० वाजता कुडाळ भैरववाडी (कुडाळ अपघात) येथे अपघात झाला. अचानक थांबलेल्या मोटरसायकलस्वाराला वाचण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्यालगत कलंडली (कुडाळ अपघात). मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

या बसमधून २५ प्रवाशी प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती कुडाळ आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी दिली.

सावंतवाडी आगारातून सुटलेली बस कुडाळ बसस्थानकातून कणकवलीकडे मार्गस्थ झाली.

भैरववाडी येथे या बससमोर चालणाऱ्या मोटरसायकलस्वाराने अचानक ब्रेक लावला.

त्याला वाचविण्यासाठी बसचालकाने ब्रेक दाबत बस रस्त्याच्या कडेला घेत मोटारसायकलस्वाराला वाचण्याचा प्रयत्न केला.

मात्र यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगत सखल भागात कलंडली.

चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

या बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवाशी सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगरसेवक सचिन काळप, माजी पं.स.सदस्या पूजा पेडणेकर, आगार प्रमुख सुजित डोंगरे यांच्यासह एस.टी च्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या प्रवाशांना पर्यायी देवरूख बसमधून पुढे मार्गस्थ करण्यात आले.

अपघातादरम्यान येथील रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

कुडाळचे वाहतूक पोलिस एकनाथ सरमळकर व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न केले.

आठ दिवसांत दुसरा अपघात

आठ दिवसांत हा ठिकाणचा एस.टीचा हा दुसरा अपघात आहे. आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी काही अंतरावर एका बसला असाच अपघात झाला होता.

या ठिकाणी गतिरोधकाची मागणी करूनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असून अशाप्रकारे अपघाताच्या घटना घडत आहेत.

Back to top button