यवतमाळ : हेलिकॉप्टर ची ट्रायल घेताना ध्येयवेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू | पुढारी

यवतमाळ : हेलिकॉप्टर ची ट्रायल घेताना ध्येयवेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : एका ध्येयवेड्या तरुणाने घरीच स्‍वत:च्‍या कल्‍पनेतून हेलिकॉप्टर तयार केले. १५ ऑगस्टला  स्वातंत्र्य दिन तो हेलिकॉप्टर उडविणार होता. त्यासाठी त्याने मंगळवारी रात्री दीड वाजता ट्रायल घेतली. मात्र, यावेळी झालेल्‍या अपघातामध्‍ये त्‍याचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे ही घटना घडली. शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर शेख इब्राहिम (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मुन्ना इब्राहिम हा महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील रहिवासी होता. वेल्डिंगची कामे करीत कुलर, लोखंडी अलमारी बनविण्याचे काम तो करीत असे अशातच त्याला तीन वर्षांपूर्वी आपल्याच वेल्डिंग वर्कशॉपमध्ये हेलिकॉप्टर निर्मितीची कल्पना सुचली.

दिवसभर दुकानात काम, रात्री हेलिकॉप्‍टरची निर्मिती

सिंगल सिट हेलिकॉप्टर तयार करण्याचे ध्येय मुन्ना उराशी बाळगून होता. आपले कुटुंब चालवण्यासाठी दिवसभर स्वतःच्या वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा व रात्रीला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो हेलिकॉप्टरनिर्मिती करण्याचे काम करत होता. उल्लेखनीय म्हणजे, त्याचे शिक्षण केवळ इयत्ता नववीपर्यंत झाले होते. कल्पनाशक्ती व अजोड कलेच्या विश्‍वासावर आपले ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी ताे अहाेरात्र कष्‍ट करत हाेता.

मारुती ८०० चे इंजिनचा वापर, पेटेंटचीही तयारी

मुन्नाने मारुती ८०० चे इंजिन वापरुन सिंगल सिट हेलिकॉप्टर बनवून पूर्णत्वासही नेले होते. येत्या १५ ऑगस्टला प्रात्यक्षिक घेऊन “पेटेंट” मिळवायची त्याची तयारी झाली होती.

नियतीला मान्य नव्हते…

मुन्नाने मंगळवारी रात्री दीड वाजता हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्याने ठरवले आणि प्रात्यक्षिक घेत असतांनाच हेलिकॉप्टरच्या मागचा पंखा तुटुन वरच्या फिरणाऱ्या मोठ्या पाते तुटले. मोठे पाते कॅबिनमध्ये बसलेल्या शेख इस्माईल उर्फ मुन्ना याच्या डोक्यावर जोरदार आदळले. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारासाठी पुसदला नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. आपले ध्येय पुर्ण करताना शेख इस्माईलचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्याच्या आकस्‍मिक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलं का? 

पहा व्‍हिडीओ :झोलगेंस्मा मिळाले पण वेदिका गेली…

Back to top button