दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, कुलगुरू संजय सावंत, मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम आदी या प्रसंगी उपस्थित होते. दि १३ रोजी सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा झाला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने सुवर्ण पालवी सुवर्णमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कोकण कृषी महोत्सवामध्ये शेती विषयक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्याची पाहणी राज्यपाल यांनी केली आणि माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यातील कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व संस्था यांची दालने महोत्सवात उभारण्यात आली आहेत. या कृषी महोत्सवामध्ये रानभाज्या, शेडनेट, भात संशोधन, पशुसंवर्धन तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता, कृषी विद्यापीठाचे आजपर्यंतचे संशोधन, शासकीय योजनांची माहिती, शेतकरी उत्पादन विक्री व्यवस्था आदींची माहिती राज्यपाल यांनी जाणून घेतली.