Gyanvapi mosque : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका | पुढारी

Gyanvapi mosque : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे (Gyanvapi mosque) सर्वेक्षण करण्याचे निर्देश अलीकडेच विशेष न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात वाराणसीच्याच अंजुमन ए इंतेजामिया मस्जिद व्यवस्थापन समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, सदर प्रकरणात लक्ष घालू, अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली आहे.

सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आलेला असल्याने या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती ॲड. हुजेफा अहमदी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली. दुसरीकडे सरन्यायाधीश रमणा यांनी याचिकेशी संबंधित कागदपत्रे मागितली असून कागदपत्रे पाहिल्यावर सुनावणी घ्यायची की नाही ते पाहू, असे सांगितले.

वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिराला लागून ज्ञानवापी मशिद (Gyanvapi mosque) आहे. आक्रमणकर्त्यांनी मंदिर पाडून त्या जागेवर मशीद बांधलेली आहे. याचे ठोस पुरावे मशिदीत असल्याने त्याचे सर्वेक्षण केले जावे आणि ही जागा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिली जावी, अशा आशयाच्या याचिका वाराणसीच्या विशेष न्यायालयात दाखल झाल्या होत्या.

यावर वाराणसी न्यायालयाने १७ तारखेच्या आत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश ॲडव्होकेट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांना दिले आहेत. मिश्रा यांना हटवून दुसरा कमिशनर नेमावा, यासाठी मुस्लिम पक्षाने दबाव आणला होता, तथापि मिश्रा हेच सर्वेक्षण करतील, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मिश्रा यांच्या मदतीला दोन उपआयुक्त देण्यात आले आहेत. कोर्ट कमिशनरच्या कामात जे लोक अडथळे आणतील, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेशदेखील वाराणसीच्या विशेष न्यायालयाने दिलेले आहेत.

Back to top button