ओझरकरांच्या हक्काचं पाणी मुरतंय कुठे? चार दिवसांआड मिळते पाणी | पुढारी

ओझरकरांच्या हक्काचं पाणी मुरतंय कुठे? चार दिवसांआड मिळते पाणी

ओझर (जि. नाशिक) : मनोज कावळे
धरण तेच, पाइपलाइनही तीच आणि पाणी वितरण व्यवस्थादेखील तीच, असे असतानाही केवळ ग्रामपालिकेतून नगरपरिषदेत रूपांतर होताच येथील पाणी व्यवस्था विस्कळीत होऊन ओझरकरांना थेट चार दिवसांड पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या धरणातून ओझरला पाणीपुरवठा होतो, त्या पालखेड धरणातही पुरेशा प्रमाणात पाणी असूनही, शहरावर पाणीबाणी ओढवल्याने ओझरकरांच्या हक्काचं पाणी मुरतंय कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार पाहता, न्यायालयीन लढाईनंतर ओझर शहरात ग्रामपालिकेला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा सोडविल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, गेल्या काही काळातील स्थिती पाहता, शहरात अनेक नागरी प्रश्न आ वासून उभे ठाकले आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात घनकचरा, पाणी या सारख्या मूलभूत सुविधांची मोठी वानवा होत असून, ग्रामपालिका असताना एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा धरणात मुबलक पाणी असूनही, चार दिवसांआड केला जात आहे. त्यातही वेळेचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

पाणीबिलातही मोठा घोटाळा 

ओझर नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिले मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी सर्वप्रथम पाणीपुरवठा विभागाला प्राधान्य देत ओझर शहराच्या पाण्याचे ऑडिट केले होते. यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला अंदाजे आकारल्या जाणार्‍या बिलापोटी तत्कालीन ग्रामपंचायत व आताची नगरपरिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला महिन्यापोटी सुमारे 16 लाख रुपयांचे बिल अदा करत होती. परंतु, डॉ. मेनकर यांनी जीवन प्राधिकरणाकडून शहरासाठी वितरित होणारे पाणी व मुख्य जलकुंभात येणारे पाणी याचे रीडिंग केले, तर महिन्यापोटी 12 लाखांचेच पाणी बिल ओझरसाठी असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंदाजे बिल आकारणार्‍या जीवन प्राधिकरणाकडून ओझरच्या पाण्याचे महिन्यापोटी आकारलेले अतिरिक्त चार लाख रुपये गेले कुठे, हा प्रश्नच आहे.

छोट्या गावांना सुरळीत पाणी
ओझरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड आहे. जीवन प्राधिकरणाकडून जानोरी, मोहाडी, जऊळके, साकोरा या छोट्या गावांना नियमित पाणी वितरीत करते. याच योजनेअंतर्गत ओझर शहर असताना, नेमका ओझरलाच पाण्याचा तुटवडा कसा भासतो, यापूर्वी ग्रामपालिका असताना सुरळीत होणारा पाणीपुरवठा अचानकच अनियमित का झाला? ओझरकरांचे पाणी जाते कुठे, असे संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

पाण्याची गळती की आजून काही ?

ओझर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जीवन प्राधिकरणाकडून, आम्ही दररोज 57 लाख लिटर पाणी ओझरसाठी देतो, असे सांगितले जाते. पण, ओझरच्या जलकुंभाची क्षमताच जर 38 लाख लिटरची आहे, तर या दाव्यानुसार दररोज 20 ते 25 लाख लिटर पाणी जाते कुठे, हा मोठा प्रश्न आहे. मध्यंतरी शिवसेनेने ओझरच्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आंदोलन केले होते. त्याचवेळी आंदोलकांनी ओझरचे पाणी काही खासगी उद्योगांना विकले जात असल्याचा आरोप केला होता. मग, हे 20 ते 25 लाख लिटर पाणी खरोखरीच कुठे जाते, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चार ते पाच दिवसांनी होत आहे. त्यातही अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्यांना पाणी मिळत नाही. पाणी केवळ अर्धा तासच असते, त्यामुळे नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे.
– मालती पवार, ओझर

जलकुंभात क्षमतेपेक्षा अधिक पाणी?
ओझर शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभाची पाणी साठवण क्षमता 38 लाख लिटर इतकी आहे. ओझरला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, शहर व उपनगरासाठी दररोज तीन एमबीआर पाण्याचे वितरण केले जाते. एक ‘एमबीआर’मध्ये 19 लाख लिटर पाण्याचे वितरण होते. त्या हिशेबाने ओझरच्या जलकुंभात 57 लाख लिटर येणे अपेक्षित आहे. परंतु, जर जलकुंभाची क्षमताच 38 लाख लिटरची असताना 57 लाख लिटर पाणी येणे कसे शक्य आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यात पाणी वितरणात 10 टक्के गळतीचा हिशेब धरला, तरी हा ताळमेळ बसत नाही.

हेही वाचा :

Back to top button