दोडामार्ग : शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे तिघेजण जेरबंद | पुढारी

दोडामार्ग : शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे तिघेजण जेरबंद

दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : भेकुर्ली राखीव जंगल परिसरात वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणार्‍या तिघांना येथील वनविभागाने हत्यारांसह जेरबंद केले.

त्यांच्याकडील सिंगल बार बंदूक, काडतुसे, मोबाईल, बॅटरी असे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांना सोमवारी दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता 13 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शैलेश राघोबा नांगरे (वय 35, रा. तळकट), मंगलदास विश्‍वनाथ वेटे (37, रा. तळकट), सतीश राजाराम देसाई (32, रा. भेकुर्ली) अशी संशयितांची नावे आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी दिली. ही घटना रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

वन संरक्षण अतिक्रमण व निर्मूलन सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल व त्यांचे कर्मचारी मिळून भेकुर्ली अरण्य परिसरात रविवारी रात्री गस्त घालत होते. याच जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तिघे संशयित युवक गेले.

दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना रात्री 2 वा.च्या सुमारास हे तिघे युवक त्या जंगलात संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, त्यांच्याकडे तपासणी केली असता एक सिंगलबार बंदूक, नऊ काडतुसे, तीन मोबाईल, दोन बॅटरी असे साहित्य आढळून आले. शिवाय सिंगलबार बंदूक ही विनापरवाना असल्याचे दिसून आले.

त्यांच्याकडील सर्व साहित्य जप्त करून या तिघा संशयितांनी विनापरवाना बंदूक वापरणे व शासकीय वनात अपप्रवेश केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. वनपाल श्री. काशीद, वनपाल प्र. गो. वारंग, वनपाल कि. ग. परुळेकर, पोलिस नाईक गौरेश राणे, वनरक्षक श्री. मेतर, वनरक्षक अमृता पाटील, वाहनचालक श्री. धुरी हे या कारवाईत सहभागी होते.

त्यानंतर संशयित आरोपींना दोडामार्ग येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता 13 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक सं. ब. सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे करत आहेत.

Back to top button