…तर कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडणार? कर्मचा-यांचा संप | पुढारी

...तर कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडणार? कर्मचा-यांचा संप

चिपळूण,पुढारी वृत्तसेवा : महानिर्मिती कंपनी मधील कर्मचारी संघटनांनी दि. 28 व 29 मार्च रोजी संप पुकारला आहे. कंपनीकडील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संप कालावधीमध्ये कोळकेवाडी धरण पायथा विद्युतगृह (कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 3) बंद राहणार आहे. यावेळी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी वक्रद्वारे उघडण्याची व्यवस्था करणेबाबत महानिर्मिती कंपनीने सूचित केले आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना अलर्ट देण्यात आला आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा 1, 2 व 4 मधून कोळकेवाडी धरणामध्ये पाणी येणे चालू राहिल. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोळकेवाडी धरणामधून बोलादवाडी नाल्यामध्ये पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलादवाडी नाल्यामधील पाणी पातळीमध्ये वाढ होवू शकेल.

दरम्‍यान, बोलादवाडी नाल्यालगतच्या कोळकेवाडी, नागावे, अलोरे तसेच नदीपात्रालगतच्या खडपोली, पिंपळी व चिंचघरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दळवटणे गावापुढे वशिष्टी नदीपात्रामध्ये नेहमीप्रमाणे विसर्ग चालू राहील असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.

Back to top button