औरंगाबाद : डॉ. आंबेडकर यांच्या वस्तूंचे मिलिंद महाविद्यालयात जतन | पुढारी

औरंगाबाद : डॉ. आंबेडकर यांच्या वस्तूंचे मिलिंद महाविद्यालयात जतन

पुढारी ऑनलाईन डेस्क

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या वेळी औरंगाबादेत आले. त्यावेळी ते वापरत असलेल्या वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. बाबासाहेब मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीच्यावेळी येथील छावणी येथील निजाम बंगल्यात मुक्कामाला राहत असत. बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूमध्ये त्यांची खुर्ची, पलंग, गादी, काठी, जेवणासाठीच्या प्लेट्स व विविध प्रकारचे टॉवेल्स जतन करुन ठेवण्यात आले आहेत.

या वस्तूंचे जतन व या ठिकाणी वर्षभरात भेट देणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांनी याविषयीची माहिती जाणून घेतली. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांच्याकडून ही माहिती सर्वांनी जाणून घेतली.

मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी १९५० मध्ये झाली. त्यावेळी बाबासाहेबांसोबत भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते.

मिलिंद महाविद्यालयात असलेल्या बोधीवृक्षाचे रोपण बाबासाहेबांनी केले होते. याला खूप मोठा इतिहास आहे. गौतम बुद्धांना बौद्ध गया येथील बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. त्या बोधीवृक्षाची एक शाखा राजा अशोकाचा मुलगा महामहेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी या बोधीवृक्षाची एक शाखा याचे श्रीलंकेतील अनुराधपूर येथे रोपण केले होते. याच बोधीवृक्षाची एक शाखा बाबासाहेबांनी श्रीलंकेतून सोबत आणली होती. तीच शाखा मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीच्या वेळेस परिसरात रोपण केली होती.

Back to top button