मुंबई : पुढारी ऑनलाईन
ओमायक्रॉनचं संकट! : कल्याण, डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर पुण्यातही ओमायक्रॉचे ७ रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरात १ तर पिंपरी चिंचवडमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता केंद्र सरकारने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. सरकारने नियमावली जाहीर करायली हवी. दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण होत आहे. यामुळे बुस्टर डोसची गरज आहे का? यावर विचार होणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अजित पवार दादर येथील चैत्यभूमीवर आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या स्थितीवर भाष्य केले.
बुस्टर डोस विषयी केवळ चर्चा सुरु आहे. पण याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. बुस्टर डोसची गरज आहे का? यावर देशपातळीवर निर्णय होण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. दोन वर्षापूर्वी मार्चमध्ये दुबईतून एक जोडपं आलं. त्यामुळे कोरोना फैलावला. यामुळे आता ओमायक्रॉनमुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ८ झाली आहे. त्या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत. पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटुंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून ४४ वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली, असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला.
ओमायक्रॉनचं संकट! : नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.