District Bank Election : बिनविरोधसाठी जोर-बैठका | पुढारी

District Bank Election : बिनविरोधसाठी जोर-बैठका

कोल्हापूर ; संतोष पाटील : ‘गोकुळ’पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राजकीय ताकद वाढली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) सत्ताधारी आघाडीकडून उमेदवारी म्हणजे बँकेचे हमखास संचालकपद असेच काहीसे समीकरण आहे. सर्वपक्षीय आघाडीप्रमुखांनी शक्‍तिप्रदर्शन करत बिनविरोधाची वाट अजून सोपी करण्याचा प्रयत्न केला. 275 इच्छुक रिंगणात असून, पुढील पंधरा दिवसांत रंगणार्‍या ‘माघार’नाट्यात नेत्यांची मात्र दमछाक होणार आहे.

मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेतून काँग्रेस-राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले. तरीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी बाजी मारली होती. दरम्यान, 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. राज्यात महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली. (District Bank Election)

याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याचे आर्थिक केंद्रस्थान असलेल्या गोकुळ दूध संघात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करत महाविकास आघाडीने बाजी मारली. अनपेक्षितपणे विधान परिषद निवडणूकही बिनविरोध झाली. या सर्वाचा एकत्रित राजकीय परिणाम जिल्हा बँकेच्या राजकारणावर दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बँकेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किमान आठ जागांवर आपला माणूस संचालक करण्याची व्यूहरचना असेल. तर सहकारातील ताकद म्हणून काँग्रेस सहा जागांवर आग्रही राहील. जिल्ह्यात राजकीय ताकद वाढल्याने शिवसेनेला चार जागा हव्या आहेत. जनसुराज्यची तीन जागांची मागणी आहे. यासह भाजप आघाडी, स्वाभिमानी संघटना यांनाही वाटा द्यावा लागणार आहे. संचालक मंडळात खूप कमी जागा मागे-पुढे होऊन स्पेस आहे.

सध्याचे राजकीय बलाबल पाहता जिल्हा बँकेत सत्ताधारी आघाडीला बहुमत मिळवणे सहज शक्य आहे. सर्वपक्षीयांची मोट बांधताना महाविकास आघाडीतील नेत्यांची मोट कायम ठेवावी लागणार आहे. सत्ताधारी नेते या राजकीय कसरतीमधून कसे पार पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

‘करेक्ट कार्यक्रमा’ची भीती

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्‍कामोर्तब बाकी आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. पी. एन. पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. राजू आवळे, माजी आ. महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक, राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. सत्ताधारी आघाडीतील मातब्बरांनी आपली निवड बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने फासे टाकले आहेत.

निवडणूक झालीच तर प्रमुख नेते एकतर्फी बाजी मारतील, अशी स्थिती असतानाही शक्‍तिप्रदर्शनाचा नेत्यांनी हबकी डाव टाकला. नेत्यांची निवड बिनविरोध झाल्यानंतर सांगली आणि सातारा जिल्हा बँकेप्रमाणे कोल्हापुरातही कुरघोड्यांचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे. मैत्रीपूर्ण लढतीच्या आडाने अनेकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होऊ शकतो.

Back to top button