जम्मू-काश्मीर विशेष दर्जासाठी बलिदान हवे, फारूख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्‍तव्य | पुढारी

जम्मू-काश्मीर विशेष दर्जासाठी बलिदान हवे, फारूख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्‍तव्य

श्रीनगर ; वृत्तसंस्था : सध्या केंद्रशासित असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना राज्याचा दर्जा आणि मुख्य म्हणजे विशेष दर्जा परत मिळवायचा असेल, तर बलिदान द्यावे लागेल. त्यासाठीची तयारी ठेवली तर केंद्र सरकारला आपण नमवू शकू, असे वादग्रस्त वक्‍तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तसेच जम्मू-काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले.

नसीमबाग येथे पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त नॅशनल कॉन्फरन्सच्या युवक शाखेच्या रविवारी झालेल्या अधिवेशनात संबोधित करताना ते बोलत होते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत ठिय्या देऊन तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. या लढ्यात 700 शेतकर्‍यांनी प्राणांची आहुती दिली. तुम्हालाही जम्मू-काश्मीर चा विशेष दर्जा परत मिळवायचा असेल, तर अशी चिकाटी आणि बलिदानाची तयारी ठेवावी लागेल, असेही फारूख अब्दुल्ला म्हणाले. याचवेळी आपण हिंसाचाराला वा मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाला हिंसक वळण देण्याच्या विरोधात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकर्‍यांनी 11 महिन्यांहून अधिक काळ आंदोलन केले. सातशेवर शेतकरी या आंदोलनादरम्यान मरण पावले. शेतकर्‍यांच्या या चिकाटीमुळे आणि बलिदानामुळेच केंद्राला तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले. शेतकर्‍यांप्रमाणेच आपले हक्‍क आपल्याला मिळवायचे असतील, तर आपल्यालाही असाच त्याग करावा लागेल. मी स्वत: कलम 370, 35-अ पूर्ववत लागू करण्यासाठी सर्वोच्च त्यागाचे वचन दिले आहे. ते मी पाळणार आहे, असेही माजी मुख्यमंत्री म्हणाले. जातीयवाद, धर्मवादावर आधारित भेदाला आम्ही मानत नाही. बंधुभाव हे आमच्यासाठी एक मूल्य आहे.हिंसेचे समर्थन करत नाही, करणार नाही, असेही अब्दुल्ला म्हणाले.

पंजाब आणि हरियाणातील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये बँकेत नोकरीसाठी आणले जात आहे. स्थानिक लोक त्यासाठी पात्र नाहीत काय, असा प्रश्‍नही अब्दुल्ला यांनी उपस्थित केला.

Back to top button