कर्नाटक : नवोदय विद्यालयामधील ६३ विद्यार्थ्यांना कोरोना | पुढारी

कर्नाटक : नवोदय विद्यालयामधील ६३ विद्यार्थ्यांना कोरोना

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : चिक्कमंगळूर जिल्ह्यातील सीगोडू (ता. नरसिंहराजपूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयामधील 63 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. शाळेतील सर्व 418 विद्यार्थी, कर्मचार्‍यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

या शाळेत सर्वप्रथम एका शिक्षकास कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यात लक्षणे आढळल्याने त्यांनी चाचणी करून घेतली. कोरोनाचे निदान झाल्यानंतर आरोग्य खात्याने सर्व 418 विद्यार्थी, कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली. यापैकी 70 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. यामध्ये 43 विद्यार्थी, तीन शिक्षक आणि चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शनिवारी सुमारे 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परिसर सीलडाऊन केला होता.

डॉक्टर, परिचारिका, आरोग्य निरीक्षकांना विद्यालयामध्ये नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. संसर्ग पसरू नये म्हणून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. एस. उमेश परिस्थितीचा रोज आढावा घेत आहेत. विद्यालयातील सर्वांच्या घशातील द्राव आणि नाकातील द्राव चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. काहीजणांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

चार जिल्ह्यांत हाय अ‍ॅलर्ट

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्ये अ‍ॅलर्ट घोषित केले आहे. धारवाड, बंगळूर शहर, तुमकूर आणि म्हैसूर येथे दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी काटेकोर उपाययोजना राबवण्याचे
निर्देश कर्नाटक सरकारला देण्यात आले आहेत. गेल्या दोन आठवड्यांमधील आकडेवारी विचारात घेऊन धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. धारवाडमध्ये कोरोना संसर्ग 21 टक्के वाढला आहे. बंगळूर शहरात 19 टक्के, म्हैसूरमध्ये 16.5 आणि तुमकूर येथे 152 टक्के संसर्गात वाढ झाली आहे. तुमकूरमध्ये 46 टक्के संसर्ग आहे.

दरम्यान, राज्यातील आरोग्य खात्याने महाविद्यालय आणि शिक्षण संस्थांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या सूचना

धारवाड, बंगळूर शहर, तुमकूर आणि म्हैसूर या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या स्वॅबचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. विदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवावी. कोरोना हॉटस्पॉट, प्रथम आणि द्वितीय संपर्कातील लोकांची चाचण्या वाढवण्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button