नगर: पंचवीस हजारांसाठी चारशे इंजिनिअरर्सचे अर्ज, महापालिकेत 17 जागांसाठी भरती | पुढारी

नगर: पंचवीस हजारांसाठी चारशे इंजिनिअरर्सचे अर्ज, महापालिकेत 17 जागांसाठी भरती

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेते तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर इंजिनिअर पदभरतीसाठी सोमवारी (दि.17) मुलाखती घेण्यात आल्या. 17 जागांसाठी संपूर्ण राज्यभरातून 400 उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. आयुक्तांच्या दालनात मुलाखती असल्याने बाहेर इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.

महापालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात 25 हजार रुपये मानधनावर सिव्हिल इंजिनिअर, मॅकेनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनिअर आदी सुमारे 17 जागांच्या पदभरतीसाठी मनपाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या दालनामध्ये मुलाखतीला सुरुवात झाली. त्यावेळी मुले आणि मुली असे सुमारे 400 इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या.

एकाच वेळी सर्व मुलाखती ठेवल्याने नियोजनाचा फज्जा उडाला. अखेर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना दुसर्‍या दिवशी बोलविण्यात आले. मात्र, लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यातून नोकरीसाठी उमेदवार आल्याने ते दिवसभर मनपात बसून होते. मनपा अधिकार्‍यांनी पहिल्यांदा महिला उमेदवारांना प्राधान्य दिल्याने पुरूष उमेदवार बसून होते. एकाच दालनात मुलाखती असल्याने दिवसभर रांगेत ताटकळत बसावे लागले, असे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी सांगितले.

संबंधित बातम्या
Back to top button