पुरात बैलगाडी घालून गुन्ह्याचा तपास, कर्जत तालुक्यातील घटना; पोलिस उपअधीक्षकांनी अनुभवला थरार | पुढारी

पुरात बैलगाडी घालून गुन्ह्याचा तपास, कर्जत तालुक्यातील घटना; पोलिस उपअधीक्षकांनी अनुभवला थरार

कर्जत, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील बजरंगवाडीत अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव निघाले खरे, पण पुरामुळे त्यांना शासकीय वाहन सोडून बैलगाडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. तालुक्यातील बजरंगवाडीतील घटनेप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव बजरंगवाडीकडे निघाले. मात्र, गावात जाण्यास चांगला रस्ता नाही. नदीपात्रातून पलीकडे जावे लागणार असल्याने त्यांनी सरकारी वाहन नदीच्या अलिकडे उभे केले. तेथे एक कर्मचारी थांबविला.

नदीचे पात्र मोेठे आणि या परिसरात जोरदार पाऊस आल्यामुळे नदीला पूर देखील आला होता. मात्र तपास अत्यावश्यक असल्यामुळे उपअधीक्षक जाधव यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. बैलगाडीमधून पलीकडच्या काठावर जाता येईल. मात्र यामध्ये धोका आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. अखेरीस एका कर्मचार्‍याला सोबत घेऊन जाधव बैलगाडीद्वारे पुरातून नदीपल्याड गेले. सुरुवातीला त्यांना नदीपात्र छोटे वाटले. परंतु बैलगाडीतून निघाल्यावर नदीपात्र संपता संपेना. काही ठिकाणी बैलांच्या तोंडापर्यंत पाणी आले. मात्र त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. घटनास्थळी भेट देऊन पुन्हा त्याच बैलगाडीतून परत आले.

नदीपलिकडील ग्रामस्थांत रस्त्यावरून वाद झाला आहे. नदीला पूर आल्यानंतर तेथील विद्यार्थी दहा ते पंधरा दिवस शाळेला जाऊ शकत नाहीत, असे ग्रामस्थांनी सांगितले. हे काम माझ्या विभागाचे नाही. तरी संबंधित अधिकार्‍यांशी बोलून मुलांच्या शाळेसाठी काही तरी उपाययोजना नक्की करील.
– अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक, कर्जत विभाग

Back to top button