औरंगाबाद : बाजार सावंगीच्या शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी

औरंगाबाद : बाजार सावंगीच्या शेतकर्‍याची आत्महत्या

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बाजार सावंगी येथील तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. योगेश तेजराव काटकर (वय 36) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश काटकर सकाळी शेखपुर शिवारातील गट क्रमांक 36 मधील शेतात गेले होते. थोड्यावेळाने त्यांची पत्नी व मुलगी हे शेतात आले असता योगेशने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर योगेशचा लहान भाऊ श्रीराम काटकर शेतात पोचला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. बाजार सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह पाठविण्यात आला.

शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार नवनाथ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश ठोकळ, संतोष पुंड हे करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button