

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : बिबट सफारीच्या डीपीआरसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्ष, कुकडी प्रकल्पासंबंधी विविध अडचणी, महत्त्वाचे निर्णय व तालुक्यातील विविध विकासकामांची माहिती देण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पांडुरंग पवार, गणपत फुलवडे, गुलाबराव नेहेरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, भाऊ देवाडे आदी उपस्थित होते.
बेनके म्हणाले की, कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील कुकडी, घोड व मीना नदीवरील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला आहे. कुकडेश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाच्या माधमातून 4 ते 5 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. जुन्नर तालुक्यात कोबी पिकांचे नुकसान झाल्याने कृषी विभाग व प्रशासनाकडून अहवाल मागवून राज्य शासनाकडून मदत मिळविण्याचा प्रयत्न आहे.
अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिल्या आहेत. येडगाव येथील यशवंतराव स्मारकासाठी 5 कोटी, 25/15 मधून 10 कोटी, जिल्हा नियोजन मंडळातून 8 कोटी, कोल्हेमळ्यातील प्रलंबित रस्तारुंदीकरणात बाधित शेतकर्यांना भरपाई मिळण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात 22 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील पर्यटनस्थळे विकसित केल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मीना नदीवरील विविध गावांमध्ये असणार्या बंधार्यालगत शेती व वस्त्यांना पाण्यामुळे धोका निर्माण होत असल्याने तो प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असेही बेनके यांनी सांगितले. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कोणतेही भाष्य करू नये, अशी सूचना आमदार बेनके यांनी केली.