केज तालुक्यात नाव्होलीत विवाहितेची आत्महत्या; नवऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

केज तालुक्यात नाव्होलीत विवाहितेची आत्महत्या; नवऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील नाव्होली येथे एका १९ वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये, असा सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.

याबाबतची माहिती अशी की, लाखा (ता. केज) येथील बाबासाहेब घाडगे यांची मुलगी राधा हिचा विवाह नाव्होली (ता. केज) येथील अशोक वामन वरपे यांच्यासोबत झाला होता. सौ. राधा अशोक वरपे हिला तिचा नवरा अशोक वरपे व सासू, सासरा व नात्यातील महिला यांनी संगनमत करून तिला मारहाण केली. तसेच ट्रक घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३:०० वाजता राधा अशोक वरपे हिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्त्या केली. मयत राधा हिला सव्वा वर्ष वयाची एक मुलगी आहे. या प्रकरणी मयत राधा हिचा भाऊ सागर घाडगे यांच्या फिर्यादी वरून दि. १६ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२२ भा.दं. वि. ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४ व ३४ नुसार तिचा नवरा अशोक वामण वरपे, सासरा वामन दादाराव वरपे, सासु मीराबाई वामन वरपे आणि मावस सासु मंदाकीनी लक्ष्मण दातार यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मयताचा नवरा अशोक वरपे व सासरा वामन वरपे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

Back to top button