अमरावती : पेव्हिंग ब्लॉक डोक्यावर मारून वेटरची हत्या | पुढारी

अमरावती : पेव्हिंग ब्लॉक डोक्यावर मारून वेटरची हत्या

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : पेव्हिंग ब्लॉक डोक्यावर मारून एका वेटरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बसस्थानकाजवळील मार्केटमध्ये शुक्रवारी भर दिवसा सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. निलेश गणेश खाडे (32, रा. शिराळा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी आरोपी वेटर बाल्या केशव भिरंगे (48, रा. अंजनगाव बारी) याला अटक केली आहे.

निलेश खाडे हा मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजुलाच असणाऱ्या एका मार्केटमधील मनमोहन नामक हॉटेलमध्ये काम करीत होता, तर बाल्या भिरंगे हा त्याशेजारीच असणाऱ्या मराठा हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत असताना, दोन दिवसांपूर्वी दोघांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारी सकाळी सुध्दा बाल्या भिरंगेने निलेशला बाहेर निघ अशी धमकी दिली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी निलेश हा मार्केटमधील वरच्या मजल्यावरील एका ठिकाणी झोपला होता. त्यावेळी बाल्या भिरंगेने झोपेत असलेल्या निलेशच्या डोक्यावर पेव्हिंग ब्लॉक मारून, त्याची हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक निलीमा आरज यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पुजा खांडेकर व पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी चौकशी करून तत्काळ आरोपी बाल्या धिरंगेला अटक केली. पुढील चौकशी पोलिस करीत आहे.

हेही वाचा

Back to top button