हैदराबादची घोडदौड… कोलकाताला चिरडले; राहुल-मार्कराम कडाडले | पुढारी

हैदराबादची घोडदौड... कोलकाताला चिरडले; राहुल-मार्कराम कडाडले

मुंबई ः वृत्तसंस्था
राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम ही जोडी एखाद्या विजेसारखा कडाडली आणि केकेआरला हादरवून गेली. त्रिपाठीने 71 तर मार्करामने नाबाद 68 धावा कुटल्या. या धमाकेदार खेळीच्या बळावर हैदराबाद सनरायझर्सने कोलकाता नाईट रायडर्सला शुक्रवारच्या लढतीत 7 गडी राखून धूळ चारली. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीलाच दोन पराभव स्वीकारलेल्या हैदराबादचे आता 5 सामन्यांतून 6 गुण झाले आहेत. 3 विजय आणि 2 पराभव अशी कामगिरी त्यांनी आतापर्यंत बजावली आहे. कोलकाताचे 6 सामन्यांतून 6 गुण झाले आहेत. त्यांनी 3 विजय मिळवले असून तेवढेच पराभव स्वीकारले आहेत. 37 चेंडूंचा सामना करताना त्रिपाठीने चार वेळा चेंडू सीमापार टोलवला तर सहा वेळा प्रेक्षकांत फेकून दिला. त्याच्या याच खेळीने सामन्याचा नूर पालटवला. मग त्रिपाठीच्या खेळीवर कळस चढवला तो एडन मार्करामने. त्याने केवळ 36 चेंंडूंत नाबाद 68 धावा झोडल्या. त्याने सहा चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. तब्बल 13 चेंडू बाकी असताना हैदराबादने विजयावर आपले नाव कोरले.

विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात धक्कादायक झाली. अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन हे त्यांचे सलामीवीर अनुक्रमे 3 आणि 17 धावांवर बाद झाले. त्यावेळी फलकावर 39 धावा लागल्या होत्या. पॅट कमिन्सने शर्माचा त्रिफळा उडवला तर आंद्रे रसेलने विलियम्सनची तशीच गत केली. मात्र त्यानंतर एखादा ज्वालामुखी उसळावा तशी कडकडीत फलंदाजी त्रिपाठीने केली. केवळ 21 चेंडूंत त्याने अर्धशतक साजरे केले ते 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांसह. त्याचा स्ट्राईक रेट तेव्हा होता तब्बल 245. दुसरीकडे एडन मार्कराम हाही रंगात आला होता. त्याने 31 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले.

हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकाताने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या. नितीश राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या नाबाद 49 धावा हे केकेआरच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. केकेआरची सुरुवात खराब झाली. व्यंकटेश अय्यर (6), एरॉन फिंच (7) आणि सुनील नारायण (6) हे बिनीचे फलंदाज त्यांनी 31 धावांत गमावले. त्यामुळे धावांना खीळ बसत गेली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी संयमी फलंदाजी केली. मुख्य म्हणजे त्यांनी आणखी बळी जाणार नाही याची दक्षता घेतली. व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांचे बळी टी. नटराजन याने घेतले. तसेच एरॉन फिंच याला मार्को जेन्सनने तंबूचा रस्ता दाखवला.

उमरान मलिक याने कर्णधार श्रेयस अय्यर याचा त्रिफळा उद्ध्वस्त करून कोलकाताला तडाखा दिला. फलकावर तेव्हा 70 धावा लागल्या होत्या. श्रेयसने 25 चेंडूंत 28 धावा केल्या त्या तीन चौकारांनिशी. नितीश राणा आणि श्रेयस यांनी 39 धावांची भागीदारी केली. शेल्डन जॅक्सन 7 धावा करून उमरान मलिकचा बळी ठरला. त्यावेळी फलकावर 103 धावा लागल्या होत्या. राणाने एक बाजू छान लावून धरली. 17 षटके संपली तेव्हा कोलकाताने 138 धावा केल्या होत्या.

आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी तुफानी फलंदाजीचा सपाटा लावला होता. मग नटराजनने धोकादायक राणाला निकोलस पूरनकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. राणाने 36 चेंडूंत 54 धावा केल्या. अर्धा डझन चौकार व दोन उत्तुंग षटकार खेचून त्याने रसिकांचे मनोरंजन केले. पॅट कमिन्स फार काळ तग धरू शकला नाही. वैयक्‍तिक 3 धावांवर त्याला भुवनेश्‍वर कुमारने टिपले. अमन हकीम खान याने 5 धावा केल्या आणि त्याला जगदीशा सचितने त्रिफळाबाद केले. रसेलने केवळ 25 चेंडूंत नाबाद 49 धावा कुटल्या. चार चौकार लगावून त्याने चार वेळा चेंडू प्रेक्षकांत भिरकावून दिला. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच कोलकाताला 175 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून नटराजनने तीन, उमरान मलिकने दोन तर जेन्सन, भुवनेश्‍वर कुमार आणि सचित यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

Back to top button