औरंगाबाद : मोबाईल रिचार्जला घरच्यांनी पैसे दिले नाही म्‍हणून तरूणाची आत्महत्या - पुढारी

औरंगाबाद : मोबाईल रिचार्जला घरच्यांनी पैसे दिले नाही म्‍हणून तरूणाची आत्महत्या

पैठण ; पुढारी वृत्तसेवा

पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील (२१ वर्ष) तरुणाला घरच्यांनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे दिले नसल्‍याच्या कारणातून या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अक्षय रावसाहेब सातपुते असे आहे.

या विषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील राहाटगाव परिसरातील शेती वस्तीवर राहणाऱ्या अक्षय रावसाहेब सातपुते याने आपल्या घरच्यांना मोबाईल मध्ये रिचार्ज करायचा आहे म्हणून पैशाची मागणी केली. परंतु घरच्यांनी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे दिले नाहित. याचा राग आल्‍याने तरूणाने घरालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे पैठण पोलीस ठाण्यात सदरील मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विठ्ठल एडके हे करीत आहेत.

Back to top button