Nagar : नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश | पुढारी

Nagar : नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील बालेवाडी येथे रविवारी (दि.11) उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, ज्येेष्ठ नेते रामराजे निंबाळकर, रमेश थोरात, राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, नागवडेंच्या प्रवेशामुळे महायुतीत श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासमोर उमेदवारीसाठी स्पर्धक निर्माण झाला आहे.

नागवडे दाम्पत्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याकाळात राजेंद्र नागवडे यांनी अनेकदा अजित पवार यांची भेट घेतली होती. मागील आठवड्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी अनुक्रमे काँग्रेस व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदांचे राजीनामे देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची घोषणा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली होती. त्यानुसार रविवारी पुणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवा मिशन मेळाव्यात नागवडे दाम्पत्याचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, बाजार समितीचे माजी सभापती धनसिंग भोईटे, दीपक नागवडे, काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते, माजी सभापती सखाराम जगताप, ज्ञानदेव गवते, अप्पासाहेब धायगुडे, बंडू जगताप, माधुरी आदेश नागवडे, सुरेखा शिर्के, सुरेखा लकडे आदींसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Back to top button