विक्रमी आवक झाल्याने लाल कांदा गडगडला | पुढारी

विक्रमी आवक झाल्याने लाल कांदा गडगडला

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (दि. 25) लाल कांद्याचे भाव क्विंटलमागे 700 रुपयांनी घसरल्याने शेतकरी हतबल झाले. लिलावासाठी तब्बल पावणेदोन लाख गोण्या कांद्याची आवक झाली. विक्रमी आवक झाल्याने भाव गडगडल्याचे सांगण्यात आले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी कांद्याची 1 लाख72 हजार 711 गोण्या म्हणजे 94 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली. अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे सोमवारी (दि. 22) कांद्याचे लिलाव बंद होते. त्याआधी शनिवारी (दि. 20) कांद्याची दोन लाख 44 हजार गोण्यांची आवक झाली होती.

त्या दिवशी एक नंबरच्या कांद्याला 199 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. गुरुवारी मात्र लिलावासाठी पावणेदोन लाख गोण्या कांदा आवक झाली. निर्यातबंदीमुळे सध्या कांद्याचे भाव घसरले आहेत. शिवाय लाल कांदा लवकर खराब होत असल्याने व्यापार्‍यांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कांदा भाव घसरल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. गुरुवारी एक नंबरच्या कांद्याला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. नंबर दोनच्या कांद्याची 500 ते 800 रुपये, तर नंबर तीनच्या कांद्याला 250 ते 400 रुपये भावम मिळाला. लहान कांद्याची 100 ते 200 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झाली. आडत, हमाली व वाहतूक खर्च वजा जाता पदरात काहीच पडले नाही. उत्पादनाचा खर्च खिशातून टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडताच शेतकर्‍यांमध्ये संतप्त भावना निर्माण.

Back to top button