पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे..; एकतर्फी प्रेमातून गेला श्रावणीचा जीव | पुढारी

पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे..; एकतर्फी प्रेमातून गेला श्रावणीचा जीव

गणेश जेवरे

कर्जत : तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून श्रावणी मोहन पाटोळे या बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत श्रावणी हिचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ती तयारी देखील करत होती. मात्र, तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.. राक्षसवाडी येथील प्रतीक लक्ष्मण काळे या युवकाने श्रावणीवर एकतर्फी प्रेमामधून हा हल्ला केला. श्रावणी ही पुण्यातील हडपसर येथील भेकराईनगर येथे राहत होती.

श्रावणीच्या आईचे माहेर राक्षसवाडी असून, ती आजी, आजोबा व मामाकडे येत असे. हल्ला करणारा प्रतीक हा त्यांचा नातेवाईकच आहे. प्रतीकचे श्रावणीवर एकतर्फी प्रेम होते. तो श्रावणीला भेटण्यासाठी वारंवार पुणे येथे जात होता. सुरुवातीला श्रावणीच्या आई-वडिलांना याबाबत कोणतीही शंका आली नाही. मात्र, प्रतिकच्या बोलण्यावरून त्यांना शंका येऊ लागली आणि त्यांनी त्याला पुणे येथे येण्यास विरोध केला. त्याला यापुढे आमच्या घरी येऊ नको आणि श्रावणीलाही त्याच्याशी बोलू नको, असे त्यांनी सांगितले होते.

स्वतःचे ध्येय गाठण्याची इच्छा असणार्‍या श्रावणीने नातेवाईक असलेल्या प्रतीककडे प्रेमाच्या भावनेतून कधीही पाहिले नाही.
आपल्याला श्रावणीचा प्रतिसाद मिळत नाही, तसेच पुणे येथे येण्यासही बंदी घातल्यामुळे प्रतीक हा मनातून चांगलाच दुखावला होता. मामाच्या घरी आलेल्या श्रावणीला जेव्हा तो भेटायला गेला, तेव्हा सोबत त्याने धारदार सुरा नेला होता. याचा अर्थ तो पूर्ण तयारीने गेल्याचे दिसून येते. यावेळी घरात कोणीच नव्हते.

मामा, मामी व इतर सर्वजण शेतात गेलेले होते. आणि नेमका याच संधीचा फायदा घेत त्याने या धारदार सुर्‍याने श्रावणीचा जीव घेतला. हे करताना त्याने स्वत:वरही सुर्‍याने वार केले. दरम्यान, या घटनेत प्रतीकने वापरलेला धारदार सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. श्रावणीच्या पोटामध्ये हा सुरा खोलवर घुसविल्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. पोलिसांनी प्रतीकला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यास सांगितलेले असताना, त्याला नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मला जे करायचे होते ते मी केले..

हल्ला केल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात घेऊन जात असताना, प्रतिक हा श्रावणीच्या मामाला म्हणाला की, मला जे करायचे ते मी केले. मी तिला मारले आणि स्वतःलाही मारून घेतले आहे.

हेही वाचा

Back to top button