बिबट्यासोबत महिलेचे दोन हात; तीनवेळा परतविला बिबट्याचा हल्ला

बिबट्यासोबत महिलेचे दोन हात; तीनवेळा परतविला बिबट्याचा हल्ला

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : केवळ दैव बलवत्तर म्हणून वारुळवाडी येथील सुनीता महेश बनकर ह्या बिबट्याच्या तीनवेळा केलेल्या हल्ल्यातून बचावल्या. ही घटना मंगळवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास घडली. वारुळवाडी येथील ठाकरवाडीजवळ शेतात राहत असलेल्या सुनीता महेश बनकर या मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शेतामधील गवत कापत होत्या. या वेळी बाजूला असलेल्या उसातून बिबट्या बाहेर आला व या महिलेवर हल्ला केला. महिलेच्या गळ्याला ओढणी असल्यामुळे बिबट्याचा हल्ला असफल ठरला. काही वेळात दुसर्‍यांदा बिबट्याने महिलेवर हल्ला केला.

त्या वेळी देखील महिलेने हातातील खोर्‍याने बिबट्याचा हल्ला परतविला. पुन्हा तिसर्‍यांदा बिबट्याने महिलेच्या डोक्यावर उडी घेऊन हल्ला केला. महिलेने न घाबरता निडरपणे खोर्‍याच्या साह्याने बिबट्याचा हल्ला परतवून लावला. परिणामी, बिबट्या बाजूच्या उसात पळून गेला. बिबट्याच्या हल्ल्यानंतर सुनीता पूर्णपणे घाबरल्या. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. सुनीता यांचा आवाज घरातील लोकांनी ऐकल्यावर बाहेर येत त्यांना घरी आणले. सुनीता यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून त्यांना पिंजरा योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित महिलेचे धाडस पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुरज वाजे यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेच्या धाडसाबद्दल सत्कार केला. वन विभागाने सतर्क राहून शेतकर्‍यांनी मागणी केल्यावर तत्काळ पिंजरा लावावा, अशा मागणी केली. वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर यांनीही घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा हल्ला परतवून लावणार्‍या धाडसी महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. केवळ माझे दैव बळवत्तर म्हणून मी वाचले. वन खात्याने बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. त्यांना दूरवर सोडावे आणि बिबट्यांची नसबंदी करावी, अशी मागणी सुनीता यांनी केली. वन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.

गेगी वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news