Nagar News : अकरा कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी | पुढारी

Nagar News : अकरा कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या वीजबिल बचतीसाठी महापालिकेला जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या निधीतून शहरात तीन ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी अकरा कोटींचा खर्च होणार आहे. त्यातून महापालिकेची दर वर्षी वीजबिलात सुमारे दीड कोटींची बचत होणार आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रकल्पाच्या वाढीव दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सभापती गणेश कवडे अध्यक्षतस्थानी होते. सभेला नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदीप परदेशी, राहुल कांबळे, रूपाली वारे, सुवर्णा गेनप्पा, सुनीता कोतकर, ज्योती गाडे आदी उपस्थित होते. सभेच्या अजेड्यांवर विविध विषयान्वये 24 चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. त्यात सौरऊर्जा प्रकल्पाचा महत्त्वाचा विषय होता. सभेमध्ये अन्य कोणत्याच विषयावर चर्चा न करता सर्व विषयांना तत्काळ मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीमध्ये आज महत्त्वाचा विषय हा सौरऊर्जा प्रकल्पाचा होता. महापालिका शहरात चार ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यात फर्‍याबाग येथील मलनिस्सारण प्रकल्पासाठी 950 किलोवॉट, सावेडी कचरा डेपो येथे 300 किलोवॉट, बुरुडगाव कचरा डेपो येथे 500 मेगावॉट तर नालेगावजवळील अमरधाम येथे 250 मेगावॉट असे एकूण चार सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.
सौरऊर्जा प्रकल्पामध्ये तयार होणारी वीज महावितरणाला देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीजबिलामध्ये महिन्याकाठी दीड कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा आहे. कारण महापालिकेला महिन्याकाठी येणार्‍या वीजबिलातून सौरऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा केलेल्या युनिटचे पैसे वजा केले जाणार आहेत. दरम्यान, या प्रकल्पांसाठी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतच निधी खर्च करणे बंधनकारक आहे.

नाशिकच्या कंपनीला ठेका
महापालिकेने प्रकल्पासाठी दर निश्चित केले होते. मात्र, अंदाजपत्रकीय दरापेक्षा नाशिक येथील सनराईज सोलर कंपनीकडून 12.6 टक्के जास्त दराने निविदा आली. मात्र, अन्य कंपन्यांपेक्षा याच कंपनीचे दर कमी असल्याने त्याला मंजुरी देण्यात आली.

Back to top button