या आरोग्य केंद्रात चक्क पडक्या खोलीत रुग्णांची तपासणी !

नगर तालुका : जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क पडक्या, गळक्या खोलीत रुग्णांची तपासणी करण्याची वेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांवर आली आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, रुग्णांची हेळसांड होत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने, जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. सन 2018-19 मध्ये नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून, काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी संबंधित कंपनीला बंधनकारक होता. कोरोनाच्या नावाखाली कामाला उशीर झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, चार वर्षे उलटून देखील काम पूर्ण झाले नाही. काम कासवगतीने सुरू आहे.
संबंधित बातम्या :
- हिंगोली : औंढा नागनाथ येथे गणेश उत्सवानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
- Asian Games 2023 : चीनने अरुणाचलच्या तीन खेळाडूंचा व्हिसा नाकारला, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर
- Pune Rain news : काठापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस शेती पिकांचे नुकसान
जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आल्याने सद्यस्थितीत रुग्णांची तपासणी पडक्या, जुनाट खोलीतून सुरू आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गळत असून, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना रुग्ण तपासताना मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोना काळात देखील भर उन्हात रुग्णांची तपासणी, लसीकरण करण्यात आले होते.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र हे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असून, रस्ता अपघातातील रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. तसेच, आरोग्य केंद्रांतर्गत 16 गावे व पाच उपकेंद्रे येत असून, या गावातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रात येत असतात. परंतु, रुग्ण तपासणीसाठी तसेच बालकांना लसीकरण करण्यासाठी जागा नसल्याने रुग्णांची, बालकांची हेळसांड सुरू आहे. आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया तसेच प्रसूती करण्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्याने महिलांना दुसर्या आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे.
पडक्या इमारतीत उघड्यावरच रुग्णांची तपासणी करण्याचे काम सुरू असून, महिला रुग्णांची कुचंबना होत आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम एक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असताना, सुमारे पाच वर्षापासून धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका, मदतनीस यांच्या बैठका घेण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
आरोग्य केंद्रात सरकारच्या वतीने मोफत सुविधा देण्याची घोषणा केली आहे. परंतु, जेऊर आरोग्य केंद्रातील चित्र वेगळे आहे. जागेअभावी रुग्ण खासगी रुग्णालयात जात असून, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत अधिकारी अथवा पदाधिकारी बोलण्यास तयार नाहीत. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आरोग्य केंद्रात सुरू असून, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व दहा कर्मचार्यांचा स्टाफ असून, जागेअभावी त्यांचाही नाईलाज होत आहे. आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 16 गावे येत आहेत. येथील रुग्णांसाठी आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. परंतु, आरोग्य केंद्राचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे जेऊरचे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे यांनी सांगितले.
नूतनीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करा
आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांचे काम चांगले आहे. परंतु, जागेअभावी रुग्ण तपासताना आरोग्य कर्मचार्यांना कसरत करावी लागते. रुग्ण तसेच लहान बालकांची लसीकरणासाठी हेळसांड होत आहे. त्यामुळे नूतनीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी मजले चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव औटी यांनी केली आहे.
हेही वाचा :