Pune Rain news : काठापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस शेती पिकांचे नुकसान

मंचर : पुढारी वृत्तसेवा : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 21) सायंकाळी ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे, तसेच शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांतील सगळ्यात मोठा पाऊस काठापूरमध्ये बरसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस हुलकावणी देत होता. सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु दुपारी साडेतीन वाजता विजेच्या कडकडाटासह काठापूर बुद्रुक व परिसरात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामध्ये काठापूर बुद्रुकमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते.
संबंधित बातम्या :
- Pune news : पानशेत, वरसगावच्या विसर्गात पावसामुळे वाढ
- Pune News : जिरायती भागात रब्बी हंगामाला उपयुक्त पाऊस
- Sharad pawar/Ajit pawar : अजितदादांसमोर शरद पवार गटाची तरूण फळी; भविष्यात दोन गटात संघर्ष अटळ
अनेक शेतांमध्ये तळ्याचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले. मागील वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काठापूरमध्ये झाल्याचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असणार्या शेतकर्यांना झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकरीवर्ग पावसाच्या आगमनाने समाधानी आहे. परंतु, शेती पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतीचे झालेले नुकसान हे मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सायंकाळी साडेसहाला पाऊस उघडल्यानंतर झालेले नुकसान शेतकर्यांच्या लक्षात आले. अनेक लहान उगवलेल्या पिकांनाही तडाखा बसला आहे. एकंदरीतच हा पाऊस आनंद देणारा असला, तरीही पिकांचे नुकसानामुळे शेतकरी चिंतेतच आहे.