Pune news : पानशेत, वरसगावच्या विसर्गात पावसामुळे वाढ | पुढारी

Pune news : पानशेत, वरसगावच्या विसर्गात पावसामुळे वाढ

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पानशेत व वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणांतून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळीत 27.41 टीएमसी म्हणजे 94.02 टक्के साठा झाला होता. सायंकाळी सात वाजता पानशेतच्या सांडव्यातून 683 क्सुसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. पानशेत वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पानशेतमधून एकूण 1283 तर वरसगावच्या मुख्य सांडव्यातून 597 व वीजनिर्मिती सांडव्यातून 600 असा एकूण 1197 क्सुसेक विसर्ग सुरू आहे. टेमघरमधूनही 350 क्सुसेक विसर्ग सुरू आहे. तीनही धरणांतील विसर्गामुळे खडकवासला धरणातील पाणीपातळी वाढली आहे.

संबंधित बातम्या :

गुरुवारी सकाळपासून पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यालगतच्या धरणक्षेत्रासह मुठा-पानशेत खोर्‍यात जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. पानशेत धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता अनुराग मारके म्हणाले, पानशेत व वरसगावमध्ये पाण्याची आवक वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे ज्यादा पाणी सोडले जात आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पानशेत खोर्‍यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण साखळीची वाटचाल शंभर टक्क्यांकडे सुरू आहे. चार-पाच दिवस चांगला पाऊस पडल्यास खडकवासला पुन्हा शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

Back to top button