पुढारी ऑनलाईन डेस्क : asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना चीनने प्रवेश नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे. भारताने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. याच्या निषेधार्थ केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीन दौरा रद्द केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, भारताने हा मुद्दा एशियन गेम्स आयोजन समिती आणि ओसीए (ऑलिंपिक काऊन्सिल ऑफ एशिया) यांच्याकडे उपस्थित केला आहे. वुशू स्पर्धेची सुरुवात 24 सप्टेंबरपासून होणार आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच त्या 8 ऑक्टोबरपर्यंत चालतील. मात्र या स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध चीन असा वाद पुन्हा उफाळला आहे. चीनने आगळीक करत अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी व्हिसा नाकारला. न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत.
चीनने सांगितले की, या खेळाडूंकडे योग्य कागदपत्रे नव्हती. मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये असल्याने चीनने या खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण चीन अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाज असल्याचे सांगत तो भाग आपला असल्याचा दावा करत आहे.
या खेळाडूंना काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये झालेल्या युनिव्हर्सिटी गेम्समध्ये चीन सरकारने गैरवर्तन केले होते, तसेच स्टेपल व्हिसा दिला होता. आता पुन्हा चीनने या तिघांना सामान्य व्हिसा दिला नाही. अशा परिस्थितीत हे तिघे भारतीय वुशू संघासोबत हांगझोऊला रवाना होऊ शकले नव्हते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी सांगितले की, 'आम्हाला कळाले आहे की चीनने भारताचा अविभाज्य असणा-या अरुणाचल प्रदेश राज्यातील खेळाडूंना हांगझू येथे होणाऱ्या आशियाई खेळासाठी व्हिसा नाकारला आहे. भारतीयांसोबत केलेले या भेदभाव युक्त वर्तनाचा आम्ही निषेध करतो.'