नगर : बिबट्याचा सलग चार वेळा हल्ला | पुढारी

नगर : बिबट्याचा सलग चार वेळा हल्ला

आश्वी : पुढारी वृत्तसेवा :  आश्वी – लोणी रस्त्यावर सलग दुसर्‍या दिवशी बिबट्याने तरुणावर हल्ला करुन दोघांना जखमी केले. विशेष असे की, मनुष्यावर एकाचं ठिकाणी चौथ्यांदा हल्ला करण्याच्या घटना घडल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या थरारक पार्श्वभूमीवर मोठा अनर्थ होण्यापूर्वी पिंजरा लावुन या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. संगमनेर तालुक्याच्या पुर्वेकडील गावांनमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने माणवावर हल्ला करण्याच्या घटनांनमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार (दि. 16 ) रोजी लोणी येथे मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारा मोहसीन रज्जाक पठाण (रा. टाकळीमियाँ) हा ग्राहकाची मोटार सायकल दुरुस्त करुन आश्वी खुर्द येथे देण्यास आला होता. मोटारसायकल देऊन मोहसीन पठाण हा आदीनाथ भडकवाड व आरीफ शेख यांच्या सोबत लोणीकडे जात असताना तांबे गोठा परिसरात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने जोरदार हल्ला करीत मोहसीन पठाण यास जखमी केले होते.

दरम्यान, सलग दुसर्‍या दिवशी (शनिवार दि. 17) रोजी चिंचपूर येथील विजय बाळा माळी हा दळण घेऊन जात असताना दाढ बुद्रुक शिवारात त्याच्यावर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. माळी यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धुम ठोकली. याप्रसंगी माजी सरपंच किरण तांबे यांनी जखमी माळी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी व तेथून अ.नगर येथे उपचारसाठी हलविले.
यापुर्वी (बुधवार दि. 7 जुन) रोजी रात्री दाढ खुर्द शिवारात हनुमानवाडी येथील ज्ञानेश्वर निवृत्ती अंत्रे (वय – 35 वर्षे) या तरुणावर पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झाला. प्रतापपूर शिवारात याआधी मोटारसायकल चालकावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजते. अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पिजंरा लावुन बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी पद्मश्री डॉ. विखे कारखान्याचे संचालक कैलास तांबे, भारत तांबे, किरण तांबे, समीर तांबे, शंकर तांबे, दाढ बु. चे योगेश तांबे, दाढ खुर्दचे सरपंच सतिश जोशी, संतोष जोशी, प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे, शिवाजी इलग यांनी केली आहे.

वन खात्याची उडवा-उडवीची उत्तरे..!
मागील काही दिवसांत तांबे गोठा परिसरात बिबट्याने नागरीकांवर चार ते पाच हल्ले केले, मात्र दाढ बुद्रूक गाव कोपरगाव वनविभागांतर्गत असल्याने वनविभाग पिंजरा लावण्याच्या मागणीला उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने नागरीक हैराण झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा : 

International Yoga Day 2023 : योग दिनी श्वानानेही केली योगासने; ITBP कॅम्पमधील व्हिडिओ व्हायरल

महिला केंद्रीत पर्यटन धोरणाचा जीआर जारी

Back to top button