नगर : ग्रामीण भागात एक लाख एकल महिला | पुढारी

नगर : ग्रामीण भागात एक लाख एकल महिला

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडी मार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात एक लाख सातशे सव्वीस महिला एकल आढळल्या आहेत. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. त्याचबरोबर हे सर्वेक्षण करून न थांबता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी एक बैठक आयोजित करून पुनर्वसन कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. लवकरच कृती आराखडा जाहीर करण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेवून सर्व ग्रामपंचायतीना गावातील विधवा, घटस्फोटीत व परित्यक्ता व स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या महिलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ग्रामविकास अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावातील अशा महिलांची माहिती जमवली. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात 87,287 विधवा महिला, 5649 घटस्फोटीत महिला ,6492 परित्यक्ता महिला, 1298 अविवाहित मोठ्या वयाच्या महिला आहेत. अशा एकूण 100726 एकल महिला आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिलांची इतकी मोठी संख्या यानिमित्ताने प्रथमच एकत्रित प्रशासनाच्या नजरेस आली आहे.

त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करून विविध योजना राबवणे शक्य होईल. दरम्यान, विधवा महिलांची सर्वात मोठी संख्या संगमनेर (9818), राहाता (8754), नेवासा (9563), पारनेर (9040) या तालुक्यात आहे. घटस्फोटीत महिलांची सर्वात जास्त संख्या अकोले (1787) व शेवगाव (1268 ) तालुक्यात आहे. परित्यक्ता महिलांची संख्या अकोले (1612), शेवगाव (976) व संगमनेर (839) तालुक्यात जास्त आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे 8 मे रोजी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी विविध विभागांचे अधिकारी व एकल महिलांसाठी काम करणार्‍या साऊ एकल समितीचे कार्यकर्ते, महिला स्वयं रोजगारासाठी काम करणार्‍या संस्था अशी एकत्रित बैठक आयोजित केली होती. त्यात या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृतिकार्यक्रम व प्रकल्प करण्याचे ठरवले. विविध योजनांसाठी पात्रता पाहणी सर्व्हे करण्याचे व त्याआधारे विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे ठरवण्यात आले. विविध योजनांमध्ये एकल महिलांना प्राधान्यक्रम देण्याविषयी चर्चा झाली.

या बैठकीला एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अशोक कुटे, मिलिंदकुमार साळवे,कारभारी गरड,नवनाथ नेहे,बाळासाहेब जपे, प्रतिमा कुलकर्णी आदी हजर होते.

या सर्वेक्षणाचा हेतू या महिलांची संख्या नक्की करून त्यांना विविध शासकीय योजना मिळवून देणे व रोजगार मिळवून देणे ,स्वत:च्या पायावर उभे करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. या महिलांच्या रोजगारासाठी प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.
                                                                    – आशिष येरेकर, सीईओ

Back to top button