नगर : बदली दरबारात 975 कर्मचार्‍यांचे ‘कौन्सिलिंग’ ! | पुढारी

नगर : बदली दरबारात 975 कर्मचार्‍यांचे ‘कौन्सिलिंग’ !

नगर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, बदल्यांमध्ये पारदर्शीता व सुसूत्रता यावी, म्हणून यंदा पहिल्यांदाच एसपी राकेश ओला यांनी ‘कौन्सिलिंग’ पद्धत वापरली. बदल्यांमध्ये मध्यस्थ न ठेवता ओला यांनी बदली दरबार भरवून कर्मचार्‍यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार तसेच पर्याय देवून समोरासमोर बदली प्रक्रिया पार पाडली. पोलिस अधीक्षक यांच्या ‘रोखठोक’ भूमिकेमुळे शिफारशीलाल कर्मचार्‍यांची नक्कीच कोंडी झाली असून, अनेकांना पंसतीचे ठिकाण मिळाले आहे.

जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदार व पोलिस चालक यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया मंगळवारी (दि.25) येथील पोलिस मुख्यालयाच्या हॉलमध्ये सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवशी बदल्या पूर्ण न झाल्याने बुधवारी (दि.26) रात्री उशिरापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. सुरूवातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलिस हवालदार या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्यानंतर पोलिस नाईक, शिपाई व चालक यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. बदली पात्र पोलिस अंमलदार यांना समोर बोलावून त्यांनी दिलेल्या तीन पर्यायांचा एसपींनी आधी विचार केला. दिलेल्या पर्यायानूसार बदली देणे शक्य नसल्यास राकेश ओला यांनी ‘कौन्सिलिंग’ पद्धत वापरून बदलीचे ठिकाण दिले. प्रत्येक कर्मचार्‍याला स्वत: पोलिस अधीक्षक ओला यांनी विचारणा करून बदली प्रक्रिया पार पाडली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रिपिटर्संला नन्ना..!

ज्या कर्मचार्‍यांनी एका ठिकाणी पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केला अशांनी त्याच ठिकाणी राहण्याची इच्छा व्यक्तच करू नये, असे सांगण्यात आले होते. तरीसुद्धा काहींनी पुन्हा त्याच ठिकाणी स्थगिती मिळावी यासाठी एसपींकडे विनंती केली. परंतु, एसपी ओला यांनी कोणत्याच अंमलदाराचे काहीही ऐकून न घेता बदली केली.

एलसीबीसाठी ‘नो एन्ट्री’चा बोर्ड!

स्थानिक गुन्हे शाखेत स्थान मिळविण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी खूप आटापिटा केला. बहुतांश अंमलदारांनी गुन्हे शाखेत जाण्यासाठी अर्जात पहिली पंसती दिली होती. मात्र, राकेश ओला यांनी एकाही कर्मचार्‍यांला अद्याप गुन्हे शाखेत स्थान दिले नाही. दुसरीकडे वर्षांनुवर्षे गुन्हे शाखेत बस्तान बसविलेल्या 30 ते 35 अंमलदारांना एसपी ओला यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

100 कर्मचार्‍यांचे विनंती अर्ज

पोलिस दलात कर्मचार्‍यांच्या बदल्या चर्चेचा विषय बनत असतात. काही कर्मचारी अधिकार्‍यांच्या मर्जीतील असल्याने त्यांना पसंतीचे ठिकाणाची आशा असते. मात्र, यंदा एसपींनी बदली दरबार भरविल्याने अशा कर्मचार्‍यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पसंतीचे ठिकाण न मिळाल्याने सुमारे 100 कर्मचार्‍यांनी पसंतीचे ठिकाण मिळावे, यासाठी पुन्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे विनंती केल्याची माहिती आहे.

Back to top button