नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ | पुढारी

नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ

जवळा(नगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात शुक्रवारी (दि 28) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ झाली. शेतात काढून पडलेला व अपेक्षित भाव नसल्याने विकता न आलेला कांदा पावसाने भिजू नये, म्हणून शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली. शेतात उघड्यावर काढून पडलेला कांदा प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकर्‍यांनाी धावपळ करावी लागली. जवळा परिसरात कांदा काढणीचा हंगाम जोरात चालू असून, कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांत नाराजी आहे.

परंतु रात्रंदिवस कष्ट करून मेहनतीने पिकवलेला कांदा अवकाळी पावसाच्या तावडीतून वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहे. अवकाळीच्या संकटाने कांदा साठविण्याची सोय नसलेले शेतकरी संकटात सापडले आहेत त्यांना कांदा विकावा, तर बाजारभाव नाही, ठेवावा तर कांदा चाळ नाही. त्यामुळे कांदा भिजण्याची भीती. अशा दुहेरी संकटांना शेतकरी सद्या सामोरा जात आहे.
जवळा परिसरात सध्या शेकडो टन कांदा काढून शेतातच पडलेला आहे. त्यात अवकाळी पावसाचा जोर वाढत चालल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली आहे

पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल

सोनईसह परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसानंतर शनिवारी दुपारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. सततच्या पाऊस व वादळा मुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज ा कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले

अतिवृष्टीने नुकसान झालेला परिसरातील शेतकरी सावरत असताना पुन्हा दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने परिसराला झोडपून काढत पिकांत पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महादेव मंदिर परिसरातील झाड रस्त्यावर पडल्याने बेल्हेकरवाडी रस्ता काही वेळ बंद होता.

पावसाने सोनईसह हनुमानवाडी, वंजारवाडी, लांडेवाडी, गणेशवाडी, बेल्हेकरवाडी, पानसवाडी, शिंगणापूर, शिरेगाव, खेडले परिसरात पावसामुळे सगळीकडे पिकांची हानी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Back to top button