सावेडी : वारंवार वीज खंडित; व्यावसायिक हैराण | पुढारी

सावेडी : वारंवार वीज खंडित; व्यावसायिक हैराण

सावेडी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या कालावधीत वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून, व्यवसायिकांमधून माहवितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शनिवारी (दि.22) अक्षय तृतीया व रमजान ईद या सणा दिवशीही 25 ते 30 वेळा वीजपूरवठा खंडित झाला. रात्रीही वीज खंडित झाल्याने व्यवसायिकांची मोठी पंचायत झाली.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील कापड बाजार, डाळ मंडई, आडते बाजार, सराफ बाजार आदी परिसरात शनिवार (दि. 22) अक्षय तृतीया व रमजान ईदच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, परिसरात वारंवार होणारा खंडित वीज पुरवठ्याने व्यपारी चांगलेच त्रस्त झाले. तसेच, दुकानात येणार्‍या ग्राहकांनाही उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

अक्षय तृतीयाला दिवसभरात 25 ते 30 वेळा वीज पुरवठा खंडित झाला. त्यात 15 ते 20 मिनिटे अंतरावर वीज खंडित होतअसल्याने दुकानातील बॅटरी चार्ज करणेही जिकरीचे झाले. यामुळे सराफ व्यवसायिकांसह व्यापार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या वारंवार होणार्‍या खंडित वीज पुरवठ्यामुळे चांगलेच वैतागले होते. सणासुदीच्या दिवशी वीज खंडित होण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत व अधिकार्‍यांबाबत प्रचंड रोष निर्माण झाला.

दागिन्यांचे वजन दाखविणे झाले कठीण
अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधण्यासाठी सराफ बाजारपेठत गर्दी होती. मात्र, आता जुने वजन काटे नसून त्या जागेवर इलेक्ट्रॉनिक वजन काटे आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना दागिन्यांचे वजन दाखवणे कठीण झाले. यामुळे दुकानात गर्दी होऊन ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

वीज मंडळ कार्यालयात आठ ते दहा वेळा संपर्क केला. मात्र, संबंधित कर्मचारी फोन उचलत नाहीत. तक्रारही घेत नाहीत.

                                     -संजय जगदाळे, व्यावसायिक, सराफ बाजार

अक्षय तृतीया व रमाजन ईदमुळे बाजार पेठेत विजेचा जास्त वापर होत होता. त्यामुळे रोहित्रावर भार पडल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित झाला.

                                        – अक्षय शिंदे, महवितरण कर्मचारी, नगर

Back to top button