अहमदनगर: राजूर – मवेशी फाटा रस्त्यावर साईड पट्टीचं काम निकृष्ट | पुढारी

अहमदनगर: राजूर - मवेशी फाटा रस्त्यावर साईड पट्टीचं काम निकृष्ट

अकोले, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूर गावाला जोडणाऱ्या माणिक ओझर ते मवेशी फाटा रस्त्याच्या रुंदीकरणात साईडपट्टीचं काम निकृष्ट होत आहे. यामुळे मालवाहतूक ट्रक पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

राजुर- माणिकओझर- तोलारखंड या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या रस्त्याच्या कामाला जानेवारी महिन्यात मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले. मात्र शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर अकोल्यातील अनेक कामांना स्थगिती मिळाल्याने कामे ठप्प झाली होती. यामध्ये या रस्त्याचा देखील समावेश होता. आ.डॉ. किरण लहामटे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करत रस्त्याच्या कामावरची स्थगिती उठवली. यानंतर रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या रस्त्यावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून रस्ता रुंदीकरण, साईड पट्ट्या, बीबीएम, कारपेट, सिल्कोट करण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून माणिक ओझर ते मावशी फाट्यापर्यंत साईड पट्ट्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना खराब खडीचा वापर केला आहे. तसेच पाणी न मारता रोलर फिरवल्याने रस्त्याचे काम दर्जात्मक न होता निकृष्ट झाले आहेत. परिणामी या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.

काही ठिकाणी या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आल्यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने काम कधी पूर्ण होणार, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या रस्त्याच्या पूर्णत्वाकडे राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी भागातुन होत आहे.

माणिक ओझर ते मवेशीफाटा रस्ता रुंदीकरणात साईड पट्टी व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्याची सुचना संबंधित एजन्सी महेश जाजू यांना केली आहे. तसेच या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून दर्जात्मक करून घेतले जाईल
– गौरव जाधव, कनिष्ठ अभियंता, सा.बा.उपविभाग, राजूर.

Back to top button