माजी जि. प. सदस्यासह तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; संगमनेरची घटना | पुढारी

माजी जि. प. सदस्यासह तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; संगमनेरची घटना

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  घुलेवाडीतील एका महिलेने झाडे तोडण्याच्या कारणावरुन दिलेल्या तक्रा रीचा राग मनात धरुन माजी जि. प. सदस्य सिताराम राऊत यांच्यासह तिघांनी महिलेचा विनयभंग करीत सासू-सासर्‍यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरालगल घुलेवाडीमध्ये राहणार्‍या एका महिलेच्या घराच्या आसपास असलेली झाडे परस्पर तोडण्यात आल्याबाबत संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्याचा राग मनात धरुन त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीत राहणारे सुनील दगडू रोकडे, राजू यादव खरात व सीताराम पुंजाजी राऊत या तीन जणांनी पीडित महिलेच्या घरी जावून तिला शिवीगाळ व दमबाजी केली.

तिचे हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. या प्रकाराला विरोध करण्यासाठी महि लेचे वृद्ध सासू व सासरे पुढे आले असता तिघांनी त्यांनाही धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या महिलेच्या मालकीचे शौचालय पाडले. जाता- जाता, ‘आमच्या नादाला लागायचे नाही,’ असा सज्जड दम दिला. याबाबत त्या महिलेने संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील तीन जणांच्या विरोधात विनय भंगाचा व हाणामार्‍यांचा गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल दोन महिन्यानंतर एका माजी जिल्हा परिषद सदस्यासह तिघा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता एक वेगळी कलाटणी मिळते की काय, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

या प्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही..!
घुलेवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असल्याने वाद मिटविण्यासाठीचा ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीकडे अर्ज आल्यामुळे आपण त्या महिलेच्या घरी गेलो होतो, मात्र आपले नाव या गुन्ह्यात कसे आले हे मला माहित नाही. आपला याप्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य व घुलेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सिताराम राऊत यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button