बालविवाह करणाऱ्यांनो सावधान ! गावच्या सरपंचाची असेल तुमच्यावर बारीक नजर | पुढारी

बालविवाह करणाऱ्यांनो सावधान ! गावच्या सरपंचाची असेल तुमच्यावर बारीक नजर

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. आपल्या आजूबाजूला, गावात बालविवाह होत असतील तर सुजाण नागरिकांनी संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, स्थानिक पोलिस स्टेशन, संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना तसेच चाईल्ड लाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हयातील सर्वच गावात ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत असून त्या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी व एकवीस वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा यांचा बालविवाह होणार नाही, याची जबाबदारी गावचे प्रमुख म्हणून सरपंच यांची आहे. बाल संरक्षण समितीची नियमित बैठक घेऊन इतिवृत्त व कार्यवाहीचा अहवाल अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा. यासोबतच गावातील ग्रामसेवक यांची ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामधील आपल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.

22 एप्रिल 2023 अक्षय्य तृतीयाचा महत्त्वपूर्ण मुहूर्त असल्याने या शुभमुुहूर्तावर विविध ठिकाणी विवाह सोहळे होत असतात. या विवाह सोहळयात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षय्य तृतीया या सणाच्या दिवशी कोठेही बालविवाह होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी. जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांनी सतर्क राहून बालविवाह प्रकरणात हस्तक्षेप करून असे होणारे बालविवाह थांबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले.

Back to top button