कोपरगाव : शेतमाल चोरणार्‍यांना अटक; 3 दुचाकींसह 1.36 लाखाचा मुद्देमाल केला जप्त | पुढारी

कोपरगाव : शेतमाल चोरणार्‍यांना अटक; 3 दुचाकींसह 1.36 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारातील एका शेतकर्‍याच्या कांदा चाळीतून 4 क्विंटल सोयाबीन व 50 किलो गव्हाची चोरी झाली होती. यानंतर कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 12 तासांमध्ये गुन्ह्यातील 3 आरोपींना जेरबंद केले. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना दि. 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे आदेश दिल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

पो. नि. देसले म्हणाले, तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारातील शेतकरी रमेश भिकाजी आंबिलवादे (वय 50) यांचे कांद्याचे चाळीतून 20 हजार रुपयांचे 4 क्विंटल सोयाबीन व 12 हजार रुपयांच्या 50 किलो गव्हाची गोणी 22 मार्च रोजी चोरीस गेली. या चोरीसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे गतीने फिरविली.

दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, संशयीत आरोपी ब्राम्हणगाव येथे फिरत आहेत. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, स. फौ. ए. एम. आंधळे, पो. काँ. रशीद शेख, पो. काँ. के. बी. सानप व चालक पो. ना. साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयीत आरोपी संतोष भास्कर पवार (वय 32 वर्षे), शंकर नामदेव माळी (वय 28 वर्षे), राहुल आप्पा ठाकरे (वय 25 वर्षे, सर्व रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) हे मिळून आले.

आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता उद्या (सोमवार दि. 27 मार्च) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्याचा आदेश दिला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

Back to top button