नगर : कृषी विद्यापीठाचे कामकाज पुन्हा बंद पाडले | पुढारी

नगर : कृषी विद्यापीठाचे कामकाज पुन्हा बंद पाडले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियंता विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम बदलासह विविध मागण्यांसंदर्भात सुरू केलेले धरणे आंदोलन 38 व्या दिवशी सुरूच आहे. शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याचे पाहून आंदोलकांनी तिसर्‍यांदा प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे देत विद्यापीठाचे कामकाज बंद पाडले. महाविद्यालयाला कुलूप लावून घेण्यात आले.
राज्यात कृषी शिक्षण संशोधनासाठी अग्रेसर असणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियंता विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून आंदोलनाची वेगवेगळी दिशा ठरविली जात आहे. मोर्चा, कॅन्डल मार्च, निषेधार्थ कार्यक्रम घेतल्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी आंदोलकांनी घेतल्या. दोनवेळा विद्यापीठ प्रशासकीय कार्यालयाचे गेट ताब्यात घेत कामकाज बंद पाडण्यात आले. परंतु तरीही शासनाचे लक्ष वेधले जात नसल्याचे दिसून आले. आंदोलनाच्या 38 व्या दिवशी अखेर संतप्त झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा प्रशासकीय कार्यालयाचा ताबा घेत अधिकारी व कर्मचार्‍यांना कामकाज करण्यास रोखले. आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीचा ताबा घेतला. अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी संतप्त आंदोलकांचा रौद्रावतार पाहता कामकाज बंद ठेवले. त्यानंतर आंदोलकांनी कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाला कुलूप लावले. कृषी अभियंता विद्यार्थ्यांचा संताप अनावर होत चालला आहे. कृषी अभियंता विद्यार्थी नगर मनमाड रास्तारोको करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

तेव्हापासून ते फिरकेनात
नाशिक पदवीधर निवडणूक प्रचार सुरू असताना जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांसह राज्यातील नेते कृषी अभियंता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत फोटोसेशन करीत होते. तुमच्या मागण्या योग्य असून त्या शासनाकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर गायब झालेले राजकीय नेते पदवीधर निवडणुकीनंतर पुन्हा आंदोलकांना दिसलेच नाही. राजकीय स्वार्थासाठीच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर केला का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Back to top button