नगर : शिर्डी परिक्रमेस भक्तिमय वातावरणात सुरवात | पुढारी

नगर : शिर्डी परिक्रमेस भक्तिमय वातावरणात सुरवात

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : देश विदेशातील लाखो साई भक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात, ओम साई जय साईंच्या नाम घोषात शिर्डीची साईनगरीची पहाट अक्षरशः न्हाऊन निघाली. अतिशय भक्तिमय वातावरणात साई बाबांचे पाहिले पाऊल ज्या खंडोबा महाराज मंदिराला लागले, त्या मंदिरात शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने ही १४ कि.मी.ची परिक्रमा सुरू झाली. विलक्षण मोठी अशी पालखी स्वरूपातील परिक्रमा मोठ्या उत्साहात सुरू झाली.

पाऊली पथक, साईबाबांचा गुजरातचा रथ, रतलामच्या छत्र्या, द्वारकामाईचा दृश्य दाखविणारा रथ, साई बाबांच्या जीवनावर आधारित शाळेचे चित्र रथ, ढोल ताश्यांचा निनाद यामुळे अवघा नगर मनमाड रस्ता न्हाऊन निघाला होता. १४ किमी लांबीच्या या परिक्रमेला साधू संत, प्रशासकीय अधिकारी, राजकीय व्यक्ती, देश परदेशातील भाविक, महिला, मुले उपस्थित होते. भाविकांना सेवा देण्यासाठी जागोजागी चहा, नाशताची सोय केली होती. या मार्गावरुन जाणाऱ्या बिरोबा बनात, साकुरी शिव, करडोबा नगर, या भागातील परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी सडा, रांगोळी काढण्यात आली होती. अतिशय नयनरम्य पहाटच्या वातावरणात साई नामाचा निनाद कानी पडत होता. अशा प्रसन्न वातावरण शिर्डीचा परिक्रमा मार्ग न्हाऊन निघाला होता.

Back to top button