नगर : स्थायी सभापतिपदासाठी सेनेची फिल्डिंग | पुढारी

नगर : स्थायी सभापतिपदासाठी सेनेची फिल्डिंग

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कालावधी समाप्त झाल्याने ते निवृत्त झाले. नवीन सदस्य निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात सभापतिपदाचाही कार्यकाल संपत आल्याने शिवसेनेकडून सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सभापती निवडीत राष्ट्रवादी शांत राहणार असून, शिवसेनेला संधी मिळणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.
प्रभागात विकास कामे करण्यासाठी स्थायी समितीचे सदस्य पद महत्त्वाचे आहे. अनेक नगरसेवकांचे स्थायी समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न असते. महापालिकेत स्थायी समितीसाठी 16 सदस्य आहेत.

त्यातील आठ सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता नव्याने आठ सदस्यांना स्थायी सदस्यपदी संधी मिळणार आहे. सध्या पालिकेत राष्ट्रवादी पाच, भाजप चार, शिवसेना पाच, काँग्रेस एक, बसपा एक अशी सदस्य संख्या आहे. त्यातील राष्ट्रवादी दोन, भाजप दोन, शिवसेना तीन, बसपा एक असे सदस्य निवृत्त झाले. सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे सदस्य निवृत्त झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समिती सदस्यपदी नियुक्त होण्यासाठी गटनेते व पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे.

तर, राष्ट्रवादी, भाजपमध्येही सदस्यपदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेची सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्यात पक्षाचे गटनेते आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची स्थायी समिती सदस्यपदासाठी नावे सुचवतील. त्या नावांची महापौर अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर स्थायी समिती सभापतिपदाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नव्याने निवड होणार्‍या सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य राहणार आहेत. सध्या महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार वाकळे स्थायी समितीचे सभापती आहेत. त्यामुळे आता नव्याने सभापतिपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली वरिष्ठस्तरावर सुरू असल्याची चर्चा आहे.

Back to top button