

राज्यातील मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआय, आयटी अशा यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या गुन्ह्यांची माहिती आमच्याकडेही आहे. ती आम्ही देऊ. त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिले.
पक्ष संघटनात्मक आढाव्याकरिता प्रदेशाध्यक्ष पाटील दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.
यासंबंधी एक हिंदी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामधील संवादावरुन राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिर करण्याचा डाव आखल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकार व भाजप सोडून गेलेल्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री अनिल देशमुख या सर्वांच्या बाबतीत असाच प्रकार चालू आहे.
आमच्याकडेही भाजपमध्ये असलेल्या अनेक नेत्यांची, गुन्ह्यांची माहिती आहे. ती आम्ही या यंत्रणांना देऊ. त्यांनी कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी दिले.