धक्कादायक! नवीन मोबाईलसाठी आईला हातोड्याने मारहाण | पुढारी

धक्कादायक! नवीन मोबाईलसाठी आईला हातोड्याने मारहाण

नगर : नवीन मोबाईल घेऊन दे अशी मागणी मुलाने आईकडे केली. मात्र मोबाईल घेण्यासाठी सध्या एवढे पैसे नसल्याचे आईने सांगितल्याने मुलाने आईला हातोड्याने मारहाण केली. ही घटना नगर शहरातील बाजार समितीमधील एका इलेक्ट्रॉनिक एजन्सीमध्ये 2 फेब्रुवारीला दुपारी बाराच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी की, मनीषा बाळासाहेब बोरगे (वय ४५, रा. गणेश चौक, बोल्हेगाव) या मार्केटयार्ड येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करत होत्या. त्यांचा मुलगा राज बाळासाहेब बोरगे (वय २६) हा सकाळी साडेदहा वाजता दुकानात आला आणि नवीन मोबाईल घेऊन दे, असा हट्ट त्याने आईकडे केला.

त्यावेळी आईने त्याला, सध्या एवढे पैसे नाहीत, तुला याआधीच मोबाईल घेऊन दिला होता, आता तू घरी जा, असे सांगून मनिषा यांनी मुलाला समजावून सांगितले. मात्र मोबाईल घेऊन दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असे मुलाने सांगितले. त्यानंतरही तो दुकानाबाहेर बराच वेळ बसून राहिला.

यामुळे संतापलेल्या मुलाने आईच्या डाव्या पायावर हातोडा मारून, दुकानातील जवळ असलेला स्टीलचा ग्लास आईच्या डोक्यात जोरात फेकून मारत आईला जखमी केले. या घटनेची माहिती कोतवाली पोलिस ठाण्यात महिलेने दिली. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर तिच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

Back to top button