नेवाशात ख्रिस्ती समाजाचा महामूक मोर्चा; चर्चवरील हल्ले थांबवा | पुढारी

नेवाशात ख्रिस्ती समाजाचा महामूक मोर्चा; चर्चवरील हल्ले थांबवा

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ नेवासा तालुका सकल ख्रिस्ती बांधवांनी गुरुवारी (दि.2) नेवासा तहसील कार्यालयावर महामूक मोर्चा काढला. घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर सतीश कदम व नेवासा येथील कॅथोलिक आश्रम ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरू जॉन गुलदेवकर, नेवासा तालुका पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष प्रकाश चक्रणारायण, उपाध्यक्ष पास्टर किशोर बोर्गे व तालुक्यातील सेवक, पाळक यांनी यावेळी शिस्तबद्ध मूक मोर्चा काढला.

नेवासा पंचायत समिती प्रांगणातून मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरुन तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी ख्रिस्ती बांधवांनी निषेधाचे फलक झळकाविले. धर्मगुरू कदम म्हणाले, भारतीय ख्रिश्चन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा, हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करा, धर्माच्या शिकवणीनुसार भक्तीचा आमचा हक्क आहे. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी न करता फलकांद्वारेच आपल्या भावना व्यक्त केल्या.

हातावर आणि खिशावर काळ्या फिती लावून साजातील अपप्रवृतीचा यावेळी जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. ख्रिस्ती धर्मगुरूंवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व नुकसान केलेल्या चर्चना नुकसान भरपाई मिळावी, अशी एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी निवेदन स्वीकारून समाजाच्या भावना शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले.

पोलिस निरिक्षक विजय करे, सोनईचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरिक्षक शैलेंद्र ससाणे, तुळशीराम गिते, किरण गायकवाड, गणेश गलधर, राजू केदार, बाळकृष्ण ठोंबरे, इंगळे आदी पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात जनाभाऊ मिरपगार, किशोर लोंढे, राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, रवींद्र पवार, मनोज ससाणे, शेखर वाघमारे, मुन्ना चक्रणारायण, रंजन जाधव, मार्कस बोर्डे, राजू साळवे, विश्वास चक्रनारायण, हरिश चक्रनारायण, बालूभाऊ आल्हाट, रेव्हरंड अनिल वंजारे यांच्यासह धर्मगुरू, सेवक व नागरिक सहभागी झाले होते.

Back to top button