वाळकी : रेशनच्या कमिशन वाटपामध्ये गैरव्यवहार; चौकशी करण्याची मागणी | पुढारी

वाळकी : रेशनच्या कमिशन वाटपामध्ये गैरव्यवहार; चौकशी करण्याची मागणी

वाळकी(ता .नगर); पुढारी वृत्तसेवा : स्वस्त धान्य वितरणात मोठा गैरव्यवहार झाला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अरूण बोठे यांनी केली आहे. स्वस्त धान्य वितरणाील कमिशन शासन नियमानुसार परवानाधारक संस्था, महिला बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश आहेत. असे असताना नगर तालुक्यात मात्र हे कमिशन वितरणाचे परवाने असणार्‍या संस्थांच्या बँक खात्याऐवजी सेल्समन अथवा अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्याचा प्रकार घडला आहे. कोरोना काळातील मोफत धान्य गरीब कल्याण योजनेतून धान्य वाटप करण्यात आले.

दोन वर्षांतील धान्य वितरणातील कमिशन वाटपामध्ये झालेला गैरव्यवहार अरूण बोठे यांनी माहितीच्या अधिकारातून चव्हाट्यावर आणला आहे. तालुक्यात 55 सेवा संस्थांना मिळणारे 52 लाख 11 हजार 384 रूपये कमिशन, तर 10 महिला बचतगटांना मिळणारे 6 लाख 99 हजार 18 रूपये कनिशन, असे एकूण 59 लाख 10 हजार 402 रूपयांचे कमिशन संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग करण्याऐवजी परस्पर सेल्समन अथवा अन्य व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये तहसील कार्यालय व पुरवठा विभागाकडून गैरव्यवहार झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले असल्याचे बोठे यांनी सांगितले.

धान्य वाटपातील कमिशनमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत अरूण बोठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नागरी पुरवठा मंत्री, या विभागाचे सचिव, लोकायुक्त, लाचलुटपत प्रतिबंधक विभाग आदी कार्यालयांत निवेदन दिले आहे. या त्यात तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांनी संगनमत करून खोट्या स्वरूपाची कागदपत्रे तयार केली. तसेच, सेवा सहकारी संस्थांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार करत केंद्र शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांच्या पत्नी मोनाली अरूण बोठे यांनी संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

तिसरे पेमेंट मात्र संस्थेच्या नावे!
आधीच्या दोन कमिशनची रक्कम संस्थेऐवजी सेल्समन अथवा अन्य व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. मात्र, हा गैरप्रकार उघड झाल्याने कमिशनचे तिसरे पेमेंट मात्र नियमानुसार संस्थांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या दोन कमिशन वाटपात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध होत असल्याचे बोठे यांनी सांगितले.

तहसीलऐवजी संस्थेकडून वसुली
तहसीलदारांच्या स्वाक्षरीने कमिशनची रक्कम संस्थेऐवजी सेल्समन अथवा अन्य व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ही बाब उघड झाल्याने आता सेवा संस्था सेल्समनच्या खात्यावर गेलेली रक्कम वसूल करत आहे. ती रक्कम तहसील कार्यालयाऐवजी सेवा संस्था का वसूल करत आहेत, असा प्रश्न बोठे यांनी उपस्थित केला आहे.

 

Back to top button