नगर : कापूस घरातच; शेतकरी हवालदिल | पुढारी

नगर : कापूस घरातच; शेतकरी हवालदिल

शंकर मरकड : 

भातकुडगाव : शेतकर्‍यांची लक्ष्मी, तथा पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापसानं यंदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. भाव वाढतील, या अपेक्षेने कापूस घरात ठेवला, मात्र अजूनही भाव वाढत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कापसाच्या दरात कधी होणार वाढ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे. मागील वर्षी कापसाच्या गुणवत्तेनुसार 10 हजारांपासून ते 13 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र, कापूस दर अद्यापि आठ ते साडेआठ हजार रुपयांदरम्यान स्थिरावला आहे.  अधिक भाव वाढ होईल या आशेने शेतकर्‍यांनी त्यांच्या जवळ असलेला कापूस विक्रीसाठी न आणता तो घरातच साठवून ठेवणं पसंत केलं आहे. त्यामुळे कापसाच्या दरात कधी वाढ होणार, याची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करत आहेत.

संक्रांतीला भाव वाढतो; पण..!

यंदा सुरुवातीला साडेनऊ हजारांचा दर मिळाल्याने शेतकर्‍यांना संक्रांंत सणाला कापसाचे दर किमान अकरा हजार रुपयांपर्यंत होण्याची आशा होती, परंतु दरात उलट घट झाली असल्याने शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

घरोघरी कापसाची थप्पी

दरवाढीच्या आशेने घरात थप्पी लावून ठेवलेल्या कापसाचे करावे काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यांना दरवाढीची प्रतीक्षा लागली आहे.

भावात घसरण सुरूच !

गेल्यावर्षी 2022 मध्ये दसरा- दिवाळीदरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला गेला. यामध्ये मका, तूर, कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशातच शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापसाच्या भावात घसरण होत असल्याने सर्वत्र शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अवघी 30 टक्के विक्री
जानेेवारी महिना संपायला आला असूनसुद्धा जवळपास 30 टक्केच कापसाची विक्री झाली आहे. भाववाढीच्या आशेने शेतकर्‍यांनी जवळपास 70 टक्के कापूस घरातच थप्पी लावून ठेवला आहे.  गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सहा हजार रुपयांपासून कापसाची विक्री सुरू झाली होती. ती मार्च – एप्रिलपर्यंत तेरा ते साडेतेरा हजार प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाला होता. म्हणजे आलेख चढता होता.
यंदा कापसाची विक्री सुरुवातीला साडेनऊ हजारांपासून झाली, आणि कमी अधिक दर होत आजच्या घडीला प्रतिक्विंटल सात हजारांपासून साडेआठ हजारापर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

केंद्राचे व्यापारी धार्जिणे धोरण कारणीभूत ?
यंदा बाजारात कापूस दरात मोठ्या प्रमाणावर चढ उतार पहावयास मिळतोय. निर्यात तर नाहीच वरून विदेशातून कापूस गाठी आयात केल्याने केंद्र सरकारचा दबावही यंदा दिसत आहे. देशातील कारखानदार व इतरांनी परदेशातून आयात केलेल्या लाखो गाठी कापसाचा वापर या हंगामातही सुरू झाला. परिणामी, देशातील गाठींचा उठावही कमी राहिल्याचे जाणकार सांगतात. एकप्रकारे कापूस दर न वाढण्यामागे केंद्राचे व्यापारी धार्जिणे धोरण कारणीभूत असल्याचे शेतकरी वर्ग बोलत आहेत .

Back to top button