नगर : दोन आमदारांना पडतोय… ठेकेदार भारी ! | पुढारी

नगर : दोन आमदारांना पडतोय... ठेकेदार भारी !

खेड : पुढारी वृत्तसेवा  :  ‘मनात आलं तर मतपेटीतून नेत्यांना चितपट, तर कधी डोक्यावर घेणार्‍या खेडच्या बहुचर्चित अर्धवट रस्त्याची ग्रामस्थांमधून सध्या जोरदार चर्चा आहे. खेड-आगवणवस्ती रस्त्याची कहाणीच न्यारी.. दोन आमदारांना पडतोय ठेकेदार भारी!, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याला कारणही तसेच आहे. या रस्त्याचे उद्घाटन आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांनीही मोठ्या दिमाखात केले. मात्र, उद्घाटन केलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य गेली पाच वर्षांपासून दोघांच्याही नशिबात नाही.

खेड ग्रामपंचायतअंतर्गत 2018साली खेड राज्यमार्ग ते आगवणवस्ती, असा एक किमीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. त्यावेळी तब्बल 87 लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध झाला होता. आमदार राम शिंदे यांनी उद्घाटन केले; मात्र या रस्ता कामाचा प्रारंभ खेड राज्यमार्गापासून न करता तो शेवटच्या दिशेने करावा, अशी मागणी काही ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती. तर, काही ग्रामस्थांच्या मते उलट दिशेने काम न करता राज्यमार्गापासून काम व्हावे, अशी मागणी होती.

हा रस्ता शासकीय निविदेप्रमाणे राज्यमार्गापासून व्हावा यासाठी काही ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केले. संबंधित कार्यालयाकडे त्याबाबत लेखी तक्रारीही करण्यात आल्या. यानंतर हे काम भूमिपूजन होऊन ‘जैसे थे’च राहिले. ग्रामस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन रोहित पवार यांनी आमदार झाल्यावर हा रस्ता पुन्हा फेरसर्वेक्षण करून शासन निर्णयानुसार पूर्ववत करून घेतला. त्यानंतर या रस्त्याचे आमदार पवार यांच्या हस्ते पुन्हा एकदा 2020मध्ये भूमिपूजन झाले.

भूमिपूजनानंतर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. मुरूम, माती, सिमेंटपाईप आणून खडीकरणही झाले; परंतु काम तालुक्यातील एका ठेकेदाराने केले असून, काम निकृष्ट असल्याचा आरोप करत या कामाच्या दर्जाबाबत तिव्र विरोध केला. यानंतर आजतागायत या रस्त्याचे काम बंदच राहिले. त्यामुळे आमदाार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांनाही आजतागायत हा तिढा सुटू शकला नाही.

Back to top button